Narendra Modi : ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत १६ तास चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान ऑपरेशन सिंदूरबाबत विविध सूर समोर आले. ऑपरेशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगावं, ट्रम्प खोटं बोलत आहेत असं आव्हान राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात दिलं. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले. जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा असं आपल्याला सांगितलेलं नाही असं मोदी यांनी लोकसभेत स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उत्तर दिलं. तसंच सैन्य दलांवर विश्वास ठेवायचा नाही हे कांँग्रेसचं जुनं धोरण आहे असंही मोदी म्हणाले.
एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा असं सांगितलं नाही-मोदी
जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा हे सांगितलं नाही, ९ मे च्या रात्री अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मी फोन उचलू शकलो नाही. त्यानंतर एक तासाने मी संपर्क केला ते म्हणाले पाकिस्तान तुमच्यावर मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना उत्तर दिलं, जर पाकिस्तानचा हा इरादा असेल तर तो त्यांना महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला तर त्यापेक्षा मोठा हल्ला करुन आम्ही उत्तर देऊ हे मी त्यांना सांगितलं. गोळीचं उत्तर आम्ही तोफगोळ्याने देऊ असं मी त्यांना सांगितलं. मी आज लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा सांगतो ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. पाकिस्तानने कुठलीही आगळिक केली तर त्यांना करारा जवाब मिळेलच असंही मोदी म्हणाले.
काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकचेही पुरावे मागितले होते-मोदी
आपल्या लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला काँग्रेसने पुरावे मागितले. नंतर त्यांना कळलं की आपलं चुकलं मग म्हणू लागले सर्जिकल स्ट्राईकमध्ये विशेष काय आहे? आमच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले. कुणी सांगितलं २ सर्जिकल स्ट्राईक झाले, कुणी सांगितलं ४ सर्जिकल स्ट्राईक झाले कुणी सांगितलं १५ सर्जिकल स्ट्राईक साजरे केले. जेवढा मोठा नेता तेवढी ही संख्या वाढत होती. आपल्या वायुदलाने एअर स्ट्राईक केला तेव्हा यांनी पुरावे मागितले. आता ऑपरेशन सिंदूरलाही नावं ठेवणारे हेच लोक आहेत. ऑपरेशन सिंदूर झालं हेच आधी मान्य करायला तयार नव्हते, आता विचारत आहेत ऑपरेशन सिंदूर थांबवलं का? असाही टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला.
पाकिस्तान आणि काँग्रेसचा सूरात सूर
पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानचेच होते याचे पुरावे द्या असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तु्म्ही पाकिस्तानकडून होणारी वक्तव्य बघा, स्वल्पविराम आणि पूर्णविराम यांच्यासह विधानं सारखी आढळतील. कारण पाकिस्तानही दहशतवादी आमचे आहेत याचे पुरावे द्या हे पाकिस्तानही म्हणतोय. देशाची माजी गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले. ऑपरेशन सिंदूर हा तमाशा होता असं या काँग्रेसच्या खासदाराकडून म्हटलं गेलं. जे काँग्रेसचे आका लिहून देतात ते नवे खासदार बोलतात असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.