Narendra Modi Speech : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सुरु असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे राबवलं आणि ऑपरेशन महादेव कसं राबवलं हे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. ऑपरेशन सिंदूरबाबत मी भारताची बाजू मांडायला उभा आहे. ज्यांना ही बाजू दिसत नाही त्यांना आरसा दाखवायला उभा आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोलेबाजी केली.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
भारताला आपल्या सैन्य दलांच्या क्षममतेवर, सामर्थ्यावर आणि साहसावर तसंच रणनीतीवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे याच विश्वासाच्या नात्याने पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण सूट दिली. ज्यांना भारताचं हे वास्तव दिसत नाही त्यांना आरसा दाखवण्यासाठीच मी आलो आहे.
काँग्रेसच्या छछोरपणामुळे देशाचं मनोधैर्य खच्ची झालं-मोदी
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या धमक्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. तसंच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला होता याची देखील माहिती मोदींनी सांगितली. देशातील वीरांच्या पराक्रमाला जगाचा पाठिंबा मिळाला, पण काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नसल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे, एवढंच नाही तर काँग्रेसने पहलगाम हल्ल्यातही राजकारण करत होते. काँग्रेसच्या छछोरपणामुळे देशाचं मनोधैर्य खच्ची झालं. असंही मोदींनी म्हटलं आहे.
भारतात दंगली घडवण्याचा कट होता-मोदी
दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. हा हल्ला म्हणजे क्रौर्याची परिसीमा होती. तसंच या हल्ल्यानंतर भारतात दंगली घडवण्याचा कट होता. मात्र, देशाने हा प्रयत्न हाणून पाडला. मी तेव्हाच सांगितलं होतं की दहशतवाद्यांना आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हे देखील सांगितलं होतं की दहशतवाद्यांच्या आकांना देखील शिक्षा मिळणारच. एवढंच नाही तर ते कल्पनाही करु शकणार नाहीत अशी ही शिक्षा असेल जी आपण दिली. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा असं सांगितलं नाही-मोदी
जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा हे सांगितलं नाही, ९ मे च्या रात्री अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मी फोन उचलू शकलो नाही. त्यानंतर एक तासाने मी संपर्क केला ते म्हणाले पाकिस्तान तुमच्यावर मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना उत्तर दिलं, जर पाकिस्तानचा हा इरादा असेल तर तो त्यांना महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला तर त्यापेक्षा मोठा हल्ला करुन आम्ही उत्तर देऊ हे मी त्यांना सांगितलं. गोळीचं उत्तर आम्ही तोफगोळ्याने देऊ असं मी त्यांना सांगितलं. मी आज लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा सांगतो ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. पाकिस्तानने कुठलीही आगळिक केली तर त्यांना करारा जवाब मिळेलच असंही मोदी म्हणाले.