ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत सोमवारपासून चर्चा सुरु आहे. काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण केलं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. ऑपरेशन सिंदूर हा आपला विजयोत्सव आहे असंही मोदी म्हणाले. तसंच ज्यांना भारताची बाजू दिसत नाही अशा लोकांना मी आरसा दाखवायला उभा राहिलो आहे असंही मोदी यावेळी म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
या अधिवेशनाच्या सुरुवातीला मी माध्यमांशी बोलत होतो, त्यावेळी मी म्हटलं होतं की हे अधिवेशन भारताच्या विजयोत्सवाचं अधिवेशन आहे. संसदेचं हे विशेष अधिवेशन भारताच्या गौरवासाठी आहे. मी विजयोत्सव असं म्हणतो आहे त्यावेळी मी सांगू इच्छितो की हा विजय उत्सव दहशतवादी अड्डे मातीमोल करण्याचा आहे. हा विजयोत्सव सिंदूर ची शपथ पूर्ण करण्याचा आहे. मी विजयोत्सव म्हणतो भारतीय सैन्य दलांच्या विजयाचा चेहरा आहे. मी विजयोत्सव म्हणतो आहे तर १४० कोटी भारतीयांची एकता, इच्छाशक्ती आणि विजयाचा उत्सव असं म्हणतो आहे. मी आज हा विजय भाव घेऊनच भारताची बाजू मांडण्यासाठी उभा आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही त्यांना मी आरसा दाखवयाला उभा आहे असं मोदी म्हणाले.
दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप लोकांना मारलं, ही क्रौर्याची परिसीमा होती-मोदी
१४० कोटी देशवासीयांच्या भावनेत आपला स्वर मिसळला पाहिजे यासाठी मी आज इथे उभा आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान देशाच्या लोकांनी ज्या प्रकारे मला साथ दिली, आशीर्वाद दिले. देशाच्या जनतेचं माझ्यावर कर्ज आहे. मी देशाच्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. २२ एप्रिलला पहलगामध्ये जी क्रूर घटना घडली, ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी निर्दोषांना धर्म विचारुन गोळ्या मारल्या ही क्रौर्याची परिसीमा होती. भारताला हिंसेच्या आगीत लोटण्याचा हा ठरवून केलेला प्रयत्न होता. भारतात दंगल उसळवण्याचा हा कट होता. मात्र देश एकजूट राहिला आणि तो कट सगळ्या देशाने मिळून उधळून लावला.
२२ एप्रिलच्या हल्ल्यानंतर आम्ही संकल्प सोडला होता की याचा बदला घेणार-मोदी
२२ एप्रिलच्या नंतर मी एक भाषण केलं होतं. त्यावेळी मी म्हटलं होतं की हा आमचा संकल्प आहे. आम्ही दहशतवाद्यांना धूळ चारू हे मी म्हटलं होतं. मी सार्वजनिक मंचावरुन सांगितलं होतं की शिक्षा दहशतवाद्यांच्या आकांनाही होईल. २२ एप्रिलला मी परदेशात होतो, मी तातडीने भारतात परतलो. त्यानंतर मी एक तातडीची बैठक बोलवली. त्या बैठकीत आम्ही स्पष्ट निर्देश दिले की दहशतवाला करारा जवाब दिला जाईल. तो आपला राष्ट्रीय संकल्प आहे. आपल्याला आपल्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे. त्यांचं सामर्थ्य, साहस या सगळ्यावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. त्यांना कारवाई करण्याची पूर्ण सूट दिली गेली. मी हे देखील सांगितलं की कधी, कुठे, कशा प्रकारे कारवाई करायची. मी त्या बैठकीतच हे सगळं स्पष्टपणे सांगितलं होतं.
दहशतवाद्यांच्या आकांचं कंबरडं भारताने मोडलं-नरेंद्र मोदी
आम्हाला गर्व आहे की दहशतवाद्यांना आम्ही शिक्षा दिली. ती शिक्षा अशी होती की दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची झोप उडाली आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतरच पाकिस्तानला समजलं होतं भारत काहीतरी मोठं पाऊल उचलणार आहे. ६ मे च्या रात्री आम्ही २२ मिनिटात २२ एप्रिलचा बदला आपल्या सैन्य दलांनी घेतला. पहिल्यांदा असं घडलं की पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातले दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले. बहावलपूर, मुरिके हेदेखील आपण जमीनदोस्त केलं. पाकिस्तानच्या अणुशक्तीच्या धमकीला आपण खोटं ठरवून दाखवलं. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग नाही चालणार आणि त्यापुढे भारत झुकणार नाही हे देखील आम्ही दाखवून दिली. भारताने आपली तांत्रिक ताकद दाखवून दिले. पाकिस्तानच्या छातीवर आपण अचूक प्रहार केले. पाकिस्तानचे हवाई तळ आपण उद्ध्वस्त केले. टेक्नॉलॉजीशी आधारे युद्ध करण्याचे हे दिवस आहेत. ऑपरेशन सिंदूरला यातही यश मिळालं आहे. मागच्या दहा वर्षांत आपण जी तयारी केली आहे ती केली नसती तर आपला टिकाव लागणं कठीण होतं असंही मोदी यांनी म्हटलं आहे.