बंगळुरुने आपली ओळख जगाच्या नकाशावर निर्माण केली आहे. बंगळुरु मेट्रो यलो लाइनचा शुभारंभ झाला आहे. मेट्रो फेज ३ चं भूमिपूजन झालं आहे. तसंच तीन नव्या वंदे भारत ट्रेन्सना हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. बंगळुरु ते बेळगावीच्या दरम्यान वंदे भारत ट्रेनची सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे बेळगावीच्या व्यापार, व्यवसायाला चालना मिळेल. यासह नागपूर ते पुणे दरम्यान दुसरी वंदे भारत आणि कटरा ते अमृतसर या दरम्यान तिसरी वंदे भारत सुरु करण्यात आली आहे. या ट्रेनमुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तीन नव्या वंदे भारत सुरु होत असल्याने मी देशातल्या नागरिकांना शुभेच्छा देतो. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याचं काम तंत्रज्ञानाच्या मदतीनेच झालं-मोदी
आज ऑपरेशन सिंदूरनंतर मी पहिल्यांदा बंगळुरुमध्ये आलो आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने, सैन्य दलांनी सीमेच्या पलिकडे जाऊन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तसंच पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याची आपली ताकद सगळ्या जगाने पाहिली आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं कारण यामागे सर्वात मोठी गोष्ट होती ती म्हणजे आपलं तंत्रज्ञान आणि टेक्निकली उत्तर देण्याची आपली क्षमता. मी या दोन गोष्टींसाठी बंगळुरुतल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. बंगळुरुची ओळख जागतिक पातळीवर एक महत्त्वाचं शहर म्हणून घेतली जाते आहे.
बंगळुरु शहर जोडण्यात मेट्रोची मदत होणार-मोदी
आज घडीला मॉडर्न इन्फ्रासाठी प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. आज यलो लाइन मेट्रो सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे शहरातले छोटे भाग जोडण्यात मदत होणार आहे. आज यलो लाइन सुरु झाली आहे तिसऱ्या मार्गाचं भूमिपूजन झालं आहे. तिसरी मार्गिका सुरु झाली की बंगळुरुच्या वाहतुकीला नवं बळ मिळेल, नवी उर्जा मिळेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
भारत देश म्हणजे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
बंगळुरु मेट्रोने देशाला विकासाचं नवं उदाहरण घालून दिलं आहे. CSR च्या मदतीने उभारण्यात आलेली ही मेट्रो एक उत्तम उदाहरण आहे. मी कॉर्पोरेट सेक्टरचेही आभार यासाठी मानतो. आज भारत जगातली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मागच्या ११ वर्षात आपली अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरुन पहिल्या पाचात आली आहे. लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमधला एक देश भारत असणार आहे. २०१४ मध्ये फक्त पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती. आज ११ वर्षांनी देशातल्या २४ शहरांमध्ये मेट्रोचं जाळं उभारण्यात आलं आणि ते विस्तारण्यात आलं आहे. भारत आता जगातला मेट्रोचं जाळं असलेला तिसरा देश झाला आहे. २०१४ पर्यंत भारतात फक्त ७४ विमानतळ होती. आता ही संख्या १६० च्याही पुढे गेली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.