माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी एका कार्यक्रमात भारत सरकारच्या २०१७ वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण केले. केंद्र सरकारची पुढील वर्षासाठीची दिनदर्शिका ‘मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है’ या संकल्पनेवर आधारित आहे. केंद्र सरकारची दिनदर्शिका मोदीमय असल्याचे पाहायला मिळते आहे. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर मोदींचे उद्गार दिसून येत आहेत. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये ही दिनदर्शिका उपलब्ध असणार आहे.
A sneak peak at the Government of India calendar 2017 #Calendar2017 pic.twitter.com/PegIwGCOhQ
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) December 22, 2016
‘भारत तरुणांचा देश आहे. भारताकडे प्रतिभावंतांचा मोठा ताफा आहे. सरकारचा कौशल्य विकास कार्यक्रम तरुणांना योग्य संधी पुरवत आहे,’ असे पंतप्रधान मोदींचे वाक्य जानेवारी महिन्याच्या पानावर दिसून येत आहे. तर ‘आमचे सरकार गरिबांसाठी आहे. सर्वांचा विकास व्हावा, यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. प्रगती आणि संधीचे द्वार उघडल्याने गरिबी हटवण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल,’ असे वाक्य फेब्रुवारीच्या पानावर देण्यात आले आहे. दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर पंतप्रधान मोदींचे उद्गार देण्यात आले आहेत. या दिनदर्शिकेसोबतच व्यंकय्या नायडू यांनी डिजीटल दिनदर्शिकेच्या ऍपचेदेखील अनावरण केले आहे.
केंद्र सरकारच्या दिनदर्शिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना, औद्योगिक प्रकल्पांची पाहणी करताना, शेतकऱ्यांसोबत बातचीत करताना टिपण्यात आलेली पंतप्रधान मोदींची छायाचित्रे या दिनदर्शिकेत दिसत आहेत.