दोनच दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सोनिया आणि राहुल गांधी यांनी धर्माधतेच्या मुद्दय़ावरून भाजप व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा टीकेचे लक्ष्य बनवले होते. या टीकेला येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेद नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले, मात्र धर्माधतेच्या मुद्दय़ावर अवाक्षरही न बोलता! देशात काँग्रेसविरोधी लाट असल्याचे सांगत मोदींनी भाजप सत्तेत आल्यास काय करेल याचे इंद्रधनुषी रंगाचे स्वप्नच सादर करत ‘ब्रँड इंडिया’चा गजर केला.
येथील रामलीला मैदानावर झालेल्या सव्वा तासांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या टीकेला मुद्देसूद उत्तरे दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित असल्यामुळे सोनियांनी स्वतच्या मुलाला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले नाही. प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते त्यामुळे सोनियांचे वागणे स्वाभाविक असल्याचा टोला मोदींनी हाणला. काँग्रेसमध्ये लोकशाही असून घटनेनुसारच पंतप्रधान निवडला जातो या राहुल यांचा दावाही मोदींनी खोडून काढला. ते म्हणाले की, जवाहलाल नेहरू, राजीव गांधी, मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनविण्याचा निर्णय कोठे व कसा झाला होता, हे काँग्रेसने जाहीर करावे. भाजपची उमेदवारी हवी असेल तर मनात फक्त देश असावा लागतो, असा टोला त्यांनी राहुल यांना लगावला.
“भाजपमध्ये चहा विकणारा, मागासवर्गीय जातीतील नेता पंतप्रधानपदाचा उमेदवार होवू शकतो; परंतु काँग्रेसमध्ये फक्त एकाच कुटुंबाकडे पंतप्रधानदाची गुणवत्ता आहे.”
 मोदी

सत्तेत आल्यास हे करणार..
*१०० स्मार्ट शहरे विकसित करणार
*प्रत्येक राज्यात आयआयटी, आयआयएम आणि एम्स
*महागाई नियंत्रणासाठी ‘दर संतुलन निधी’ स्थापणार.
*नदी जोड प्रकल्प राबवणार
*राष्ट्रीय कृषी बाजारपेठेची स्थापना
*साठेबाजांचे खटले विशेष कोर्टात
*काळा पैसा भारतात परत आणणार
*आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी समुद्र किनाऱ्याचा वापर
*आरोग्य विमा नव्हे आरोग्य हमी
विकासाचे सप्तरंग
*कुटुंबव्यवस्था
*ग्रामविकास, कृषी, पशू.
*महिला सबलीकरण
*पारंपारिक नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन (पाणी, जमीन, जंगल)
*युवा शक्तीची राष्ट्रनिर्माणात सक्रियता
*माहितीऐवजी ज्ञानाचा ध्यास
*लोकशाहीचे संवर्धन