‘नासा’च्या उपग्रहाने दिलेल्या माहितीचा वापर आफ्रिकेतील बोट्स्वाना देशातील झेब्रांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आला आहे. झेब्रे नेमके केव्हा स्थलांतर करतात याच्या अभ्यासातून त्यांचे संवर्धन करणे शक्य होणार आहे. आफ्रिकेतील बोट्स्वाना देशात झेब्रांचे स्थलांतर मोठय़ा प्रमाणात झाले होते पण ते केव्हा व कसे झाले असावे याची माहिती आतापर्यंत नव्हती.
नासाच्या उपग्रहांनी दिलेल्या पाऊस व पृथ्वीवरील हिरवाईच्या आच्छादनविषयक माहितीच्या आधारे केव्हा व कुठे ओसाड जमीन हिरवाईने नटू लागली हे समजते. जर प्राण्यांना त्यांच्या प्रवासात कुठे हिरवाई दिसली नाही तर ते परत फिरतात हे तत्त्व झेब्रा यांनाही लागू आहे.  
झेब्राच्या स्थलांतराचे तत्व
बोस्वानाच्या २२,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा ओकवांगो त्रिभुज प्रदेश हे झेब्रांच्या पृथ्वीतलावरील दुसऱ्या मोठय़ा स्थलांतराचे एक ठिकाण होते. हे प्राणी जिथे त्यांना चरण्यासाठी जागा मिळेल त्या दिशेने जातात. त्या स्थलांतरावेळी एका ऑक्टोबर महिन्यात मोठी ढगफुटी झाली त्यामुळे या त्रिभुज प्रदेशात पाण्याचे साठे निर्माण होऊन तिथे मोठय़ा प्रमाणावर गवत उगवले. त्यामुळे झेब्रांसाठी खाद्य तयार झाले. त्यामुळे त्यांनी तेथे स्थलांतर केले होते.
संशोधनाची उपयुक्तता
पर्यावरणातील बदलांना प्राण्यांच्या स्थलांतरातून कसा प्रतिसाद दिला जातो, ते नेमके कुठले आडाखे त्यासाठी वापरतात यावर त्यातून प्रकाश पडणार आहे. वुडस होल रीसर्च सेंटरचे संशोधन सहायक पीटर बेक व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी प्राण्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्याची ही पद्धत शोधून काढली आहे. जर्नल ऑफ जिओफिजिकल रीसर्च या नियत-कालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
नासाचे योगदान
पृथ्वी प्रदक्षिणा करणारे उपग्रह झेब्रांच्या या हालचालींच्या प्रतिमा टिपत होते व पर्यावरणातील रोजच्या बदलांचीही नोंद घेत होते. पण आता ती माहिती आधारभूत मानून संशोधक झेब्रांचे स्थलांतर केव्हा व कुठे होईल याचा अंदाज देऊ शकतात. उपग्रहांमार्फत प्राण्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या असल्या, तरी त्याची सांगड पर्यावरण उपग्रहांनी दिलेल्या माहितीशी घालून हा स्थलांतराचा अंदाज दिला जाऊ शकतो. हिरवाईची वाढ व पाऊस यांच्या नोंदी पर्यावरण उपग्रहांमार्फत घेतल्या जात असतात, त्या अनुषंगाने झेब्रांनी कुठे व केव्हा स्थलांतर केले ते ताडून पाहिले, तर त्यांच्या स्थलांतराचा हा अंदाज घेणे कठीण जात नाही.