एक छोटासा लघुग्रह पकडून त्याला चंद्राच्या कक्षेत ढकलायचे व नंतर त्याचा अंतराळप्रवासासाठी थांब्यासारखा वापर करायचा अशी भन्नाट कल्पना अमेरिकेचे सिनेटर बिल नेल्सन यांनी मांडली आहे. हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही  १० कोटी अमेरिकी डॉलरची तरतूद २०१४ च्या अर्थसंकल्पात करण्याचे मान्य केले आहे. नेल्सन हे बुधवारी हा प्रस्ताव अमेरिकी काँग्रेसला सादर करणार आहेत.
फ्लोरिडाचे डेमोक्रॅट सदस्य असलेले नेल्सन यांनी सांगितले की, ही अतिशय व्यापक अशी योजना आहे. लघुग्रहावर खाणकाम व त्याची दिशा बदलणे, त्याचा नंतर मंगळ मोहिमांसारख्या खूप लांबच्या अंतराळ प्रवासासाठी थांबा म्हणून वापर करणे असे हेतू त्यात आहेत. लघुग्रह पकडण्यासाठी रोबोटिक स्पेसक्राफ्ट म्हणजे यंत्रमानव रूपातील अंतराळयान वापरण्याचा इरादा आहे. हा लघुग्रह पकडून त्याला चंद्राच्या कक्षेत ढकलण्यात येईल, त्यानंतर आठ वर्षांतच अंतराळवीर या लघुग्रहावर जाऊ शकतील. अशीच योजना २०१२ मध्येही कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी मांडली होती, त्यानंतर या योजनेचा सखोल विचारही करण्यात आला.
अंतराळात वस्ती करण्यासाठी तेथील घटकांमध्ये बदल घडवण्याचा हा मानवी इतिहासातील पहिलाच प्रयत्न असणार आहे. जवळच्या लघुग्रहावर २०२५ पर्यंत अंतराळयान पाठवण्याची योजना होती पण ती नासाची सध्याची आर्थिक तरतूद बघता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे नाहीत. त्याऐवजी ५०० टनांचा लघुग्रह चंद्राजवळ आणला तर त्यामुळे जास्त फायदा होऊ शकतो. त्यामुळे २०२१ पर्यंत अंतराळवीर या लघुग्रहावर उतरून वस्ती करू शकतील. त्यानंतर तेथे खाणकाम करणे शक्य होणार आहे. डीप स्पेस किंवा मंगळ मोहिमांसाठी त्यामुळे तंत्रज्ञानाच्या चाचण्याही शक्य होतील असे नेल्सन यांनी सांगितले.