नासा सहा प्रगत उपग्रहसोडणार असून, ते आकाराने ब्रेडइतके ते वॉशिंग मशीनसारखे लहान असणार आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील चक्रीवादळे, ऊर्जा अर्थसंकल्प व हवामान यात दृष्टिकोन किंवा उपाययोजना ठरवण्यात मदत होणार आहे. या उपग्रहांचा आकार लहान असून, त्यांचा खर्च कमी असणार आहे. इतर मोहिमांमधील अग्निबाणांबरोबर पूरक म्हणून हे उपग्रह पाठवले जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अवकाशातील प्रक्षेपणाचा खर्चही कमी होणार आहे. नवीन तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रयोगांसाठी त्यांचा उपयोग होणार आहे. नासा लहान उपग्रह वापरण्यावर भर देत असून, त्याच्या माध्यमातून काही वैज्ञानिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे नासाच्या विज्ञान कार्यक्रम संचालनालयाचे सहायक प्रशासक थॉमस झुपबुशेन यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवकाशातील नवीन प्रयोग त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग, संशोधकांना मिळणारा प्रत्यक्ष अनुभव यात महत्त्वाचा आहे. लहान उपग्रह तंत्रज्ञान अवकाशातून पृथ्वीच्या निरीक्षणासाठी उपयोगी ठरणार आहे. यातील पाच उपग्रह पुढील काही महिन्यांत सोडले जाणार असून, त्यात बदलत्या ग्रहाच्या अभ्यासात मदत होणार आहे. नासाच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे मायकेल फ्रेलिच यांनी सांगितले, की नासाने लघु   उपग्रहातून खर्च कमी केला आहे. या महिन्यात रॅव्हन हा उपग्रह सोडण्यात येणार आहे. त्याचे पूर्ण नाव रेडिओमीटर अ‍ॅसेसमेंट युजिंग व्हर्टिकली अलाइन्ड नॅनोटय़ूब्ज असे आहे. तो क्युबसॅट प्रकारातील उपग्रह आहे. त्याचा उपयोग पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करून ऊर्जा समस्येवरील खर्च ठरवण्यासाठी होणार आहे. २०१७ मध्ये दोन क्युबसॅट उपग्रह सोडले जाणार असून, ते ढगांचा अभ्यास करणार आहेत. त्यातून वातावरणाची माहिती मिळेल. आइसक्युब हा उपग्रह नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटरचे डाँग वू यांनी तयार केला असून, त्याचा उपयोग ढगातील बर्फाचे मापन करण्यासाठी होणार आहे. त्यात मायक्रोवेव्ह रेडिओमीटरचा वापर केला आहे. हार्प म्हणजे हायपर अँग्युलर रेनबो पोलरीमीटर हा उपग्रह मेरीलँड बाल्टीमोर विद्यापीठाचे वँडेरली यांनी तयार केला आहे. त्यातून हवेतील कणांचे मापन व ढगातील बाष्पकणांचा आकार यांचा नवीन पद्धतीने अभ्यास केला जाईल. मिराटा म्हणजे मायक्रोवेव्ह रेडिओमीटर टेक्नॉलॉजी अ‍ॅक्सिलरेशन मिशन हा उपग्रह २०१७ मध्ये सोडला जाणार असून, तो शूबॉक्सच्या आकाराचा आहे. तो हवामान उपग्रह आहे. त्यावर काही संवेदक असून त्यातून तापमान, पाण्याची वाफ, ढगातील बर्फ यांची माहिती गोळा केली जाईल त्यातून वादळे व हवामानाचा अंदाज घेतला जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa will send small satellites
First published on: 09-11-2016 at 02:00 IST