अद्याप भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली नसली, तरी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्या आशयाचे सूचक वक्तव्य केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवारी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेले भाषण आणि भूजमध्ये मी केलेले भाषण याची देशातील सर्वसामान्य जनता तुलना केल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्तीत पंतप्रधान काय बोलतात आणि भूजमध्ये नरेंद्र मोदी काय सांगतात, हे देशवासीय गुरुवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. एकाबाजूला आश्वासनाची मोठी मालिकाच आहे, तर दुसऱया बाजूला पूर्ण झालेल्या कामाची माहिती आहे. एका बाजूला निराशा तर दुसऱया बाजूला आशेची किरणे आहेत, असे मोदी यांनी बुधवारी भूजमध्ये सांगितले. त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव घेणे टाळले. गुजरातमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनाचा अधिकृत कार्यक्रम गुरुवारी भूजमध्येच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भूजमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारला लक्ष्य केले.