मध्य प्रदेशच्या गुनामध्ये शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळणाऱ्या एका खेळाडूचा देखील समावेश आहे. हे सर्वजण या शस्त्रांची खेप शिवपुरी येथील त्यांच्या क्लायंटला पाठवण्याच्या तयारीत होते. याचवेळी पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून शस्त्रे जप्त केली. घटनास्थळी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून पाच भरलेली पिस्तूल आणि तीन मॅगझीन जप्त करण्यात आली आहेत.

चार आरोपींपैकी एक राष्ट्रीय कबड्डीपटूचे नाव रिंकू जाट असून तो हरियाणाचा रहिवासी आहे. रिंकू व्यावसायिक कबड्डी लीगमध्ये खेळतो, असे पोलिसांनी सांगितले. तसेच तो मौजमजा करायला पैसे कमवण्यासाठी अवैध शस्त्र विकण्याचा व्यापार करतोय, अशी माहिती पोलिसांनी दिली. रामपाल जाट, अमीर खान आणि महेंद्र रावत अशी इतर तीन आरोपींची नावे आहेत. रिंकू आणि रामपाल हे हरियाणातील सोनीपतचे रहिवासी आहेत, तर अमीर खान आणि महेंद्र रावत हे मध्य प्रदेशातील शिवपुरीचे रहिवासी आहेत.

“चारही आरोपी शस्त्रांच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या एका टोळीचा भाग आहेत. गुप्त माहितीच्या आधारे  ज्या क्रेटा कारमधून आरोपी प्रवास करत होते, ती अडवण्यात आली होती. आरोपींकडून जप्त करण्यात आलेली पाच पिस्तुले मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये बनवण्यात आली आहेत. या आरोपींना पिस्तुले पुरवणाऱ्याला पकडण्यासाठी एक टीम पाठवण्यात आली आहे. सर्व आरोपींविरोधात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी त्यांनी केलेल्या शस्त्रांच्या विक्रीची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे,” असे पोलिसांनी सांगितले.