गाझीयाबाद येथील स्थानिक भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी राजू कुमार उर्फ राजु पहिलवान या माजी आंतराष्ट्रीय कबड्डीपटूला अटक केली आहे. दिल्लीच्या सिरासपूर भागातून पोलिसांनी राजुला अटक केली आहे. राजुने २००५ ते २००९ या काळात उत्तर प्रदेश संघाचं राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व केलं आहे. या कालावधीत राजू भारतीय कबड्डी संघाचाही सदस्य होता.

गाझियाबाद येथील स्थानिक भाजप नेते गजेंद्र भाटी यांची २ सप्टेंबरला, मोटारसायकलवरुन आलेल्या २ अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात भाटी यांच्यासह त्यांचे सहकारी बलबीर सिंह गंभीररित्या जखमी झाले होते. या हत्येनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी वेगाने तपासाचे चक्र फिरवत नरेंद्र उर्फ फौजी या व्यक्तीला ११ सप्टेंबररोजी अटक केली. नरेंद्रने दिलेल्या माहितीनूसार राजू पहिलवानही या हत्येच्या कटात सहभागी असल्याचं समोर आलं. शहीदाबादचे माजी आमदार अमरपाल शर्मा यांच्या सांगण्यावरुन नरेंद्र आणि राजू पहिलवान यांनी गजेंद्र भाटी यांची हत्या केल्याचे माहिती पोलीस उपायुक्त संजीव कुमार यादव यांनी दिली. या हत्येसाठी शर्मा यांनी दोघांना १० लाखांची सुपारी दिली होती, तसेच ५० हजाराची रक्कम अॅडव्हान्स म्हणून दिली होती.

राजू पहिलवान हा दिल्लीच्या सिरासपूर भागात लपला असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. एका खबरीने पोलिसांना ही ‘टीप’ दिली होती. या माहितीवरुन उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीतून राजूला अटक केली. राजू पहिलवान बसने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

२०१३ पासून होता वाद

राजू पहिलवानच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१३ मध्ये ग्रेटर नोएडा भागात भाटी यांनी आपल्याला मारहाण केली होती. कारला धडक दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन मारहाण झाल्याचा राग मनात होता, असे राजूने पोलीस चौकशीत सांगितले. या प्रकरणी पहिलवानवर भाटी यांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल केला होता. मात्र दोघांनीही हे प्रकरण सामंजस्याने सोडवलं.

यानंतरही भाटी यांनी राजूला धमकावणं थांबवलं नाही. राजूवर ग्रेटर नोएडातील फॅक्टरीजवळ भाटी आणि त्याच्या गुंडांनी गोळीबार केला. भाटीच्या दरारामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. हा राग राजूच्या मनात होता आणि त्याने व्यवसाय बंद करुन भाटीच्या हत्येचा कट रचला. दोन महिन्यांपूर्वी राजू नरेंद्रच्या संपर्कात आला. नरेंद्र उर्फ फौजी हा माजी आमदार अमरपाल शर्मा यांच्यासाठी काम करायचा. शर्मा आणि भाटी यांच्यात राजकीय वैमनस्य होते. भाटी यांना संपवण्यासाठी अमरपाल शर्मा यांनी राजूला सुपारी दिल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.