भारत ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था तेव्हाच बनू शकतो जेव्हा देशाची राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राहील, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले आहे. नवी दिल्लीतील पोलीस संशोधन आणि विकास (BPR&D) कार्यालयाच्या ४९व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बुधवारी बोलत होते.

शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी देशांतर्गत आणि बाहेरील सुरक्षा अबाधित राखणे महत्वाचे आहे. देशांतर्गत सुरक्षा राखण्यासाठी ३४ हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी आजवर आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे आता आपल्याला सुरक्षेबाबत पुढील पावले उचलण्याची गरज आहे.

पोलीस यंत्रणेच्या सुधारणेबाबत बोलताना शाह म्हणाले, बदलत्या आव्हानांनुसार आपल्याला पोलीस दलात सुधारणा घडवून आणणेही गरजेचे आहे. मात्र, पोलीस दलात सुधारणा घडवून आणणे ही प्रचंड मोठी योजना आहे, या योजनेचा आराखडा BPR&Dने तयार करणे गरजेचे आहे. पोलीस दलात सुधारणा घडवून आणण्यासाठी पोलीस कायदा आणि भारतीय दंड विधानात बदल करण्यासाठी देशभरात याबाबत सल्लामसलतीची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. याबाबत प्रत्येकाने त्यांच्या सूचना गृहखात्याकडे पाठवाव्यात, असे आवाहनही यावेळी शाह यांनी केले.

त्याचबरोबर, एखाद्या गुन्ह्याचा कट रचणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी न्याय वैद्यक विद्यापीठे आणि महाविद्यालयांना चालणा देण्यावरही शाह यांनी यावेळी भर दिला. यामुळे पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यास मदत होईल तसेच गुन्हे करणाऱ्यांची मनोवृत्ती ठेचण्यातही मदत होईल. तपास यंत्रणांनी तपास कामात योग्य प्रकारे शास्त्रीय पद्धती अवलंबायला हव्यात, असेही मत शाह यांनी यावेळी व्यक्त केले.