पंजाब येथील चौडा बाजार भागात असलेल्या मैदानात दसऱ्या निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरून भरधाव वेगात ट्रेन गेल्याने सुमारे ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. अशात उपस्थितांचा राग निघतो आहे तो नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर कारण नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. एवढी मोठी दुर्घटना त्यांच्यासमोर घडली तरीही त्यांनी इथे थांबण्याचीही तसदी न घेता कारमध्ये बसून निघून जाणे पसंत केले. त्याचमुळे सिद्धू आणि सिद्धू यांच्या पत्नीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. सध्या या दुर्घटनेत ५० पेक्षा जास्त लोक मारले गेल्याची भीती व्यक्त होते आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार हा आकडा वाढूही शकतो.

अपघात झाल्यावर आणि एवढी मोठी घटना घडल्यावर नवज्योत कौर सिद्धू यांनी इथे थांबायला हवं होतं. मात्र त्या निघून गेल्या असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. नवज्योत कौर सिद्धू यांनी राजीनामा द्यावा आणि पंजाबवासीयांची माफी मागावी असे कृत्य त्यांच्या पत्नीने केले आहे अशी मागणीही प्रत्यक्षदर्शींनी केली आहे. दसऱ्यानिमित्त कार्यक्रम ज्या समितीने आयोजित केला होता त्या समितीचा आणि रेल्वेचा दोष असल्याने हा भीषण अपघात झाला असाही आरोप अनेक प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसेच रेल्वे ट्रॅकवर अनेक प्रेतं पडली आहेत. संपूर्ण मैदानावर आणि रेल्वे ट्रॅकवर गोंधळ उडाला आहे. सध्या या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अनेकजण या मैदानात आणि रेल्वे ट्रॅकवर हजर झाले असून ते आपल्या नातेवाईकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.