समुद्रमार्गाने जगाची सफर करत असलेल्या भारतीय नौदलातील महिलांची INSV ‘तारिणी’ केपहॉर्नला पोहोचली असून भारताचा झेंडा तेथे फडकावला आहे. नाविका सागर परिक्रमा या साहसी मोहिमेतील महिलांचे अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएनएसव्ही तारिणी या देशी बनावटीच्या बोटीतून भारतीय नौदलातील सहा महिला या साहसी मोहिमेवर मार्गस्थ झाल्या होत्या.

या प्रवासादरम्यान समुद्रातील कठीण समजला जाणारा मार्ग ‘ड्रेक पॅसेज’ त्यांनी यशस्वीरित्या पार केला. फॉकलँड बेटावरील पोर्ट स्टॅन्लेच्या दिशेने पुढे जाताना त्यांनी तिरंगा फडकावला. एकूण १६५ दिवसांच्या या प्रवासाचा पहिला टप्पा फ्रेमँटल (ऑस्ट्रेलिया) होता. त्यानंतर लिटलटन (न्यूझीलँड) हा दुसरा टप्पा त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये गाठला. आता पोर्ट स्टॅन्लेनंतर ते केप टाऊनच्या दिशेने रवाना होणार आहेत. नाविक सागर परिक्रमा या मोहिमेचे सारथ्य लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करीत आहेत. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जागतिक मंचावर ‘नारीशक्ती’चे दर्शन घडविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

INSV तारिणीची वैशिष्टे :

– भारतीय नौदलाकडे असलेली तारिणी ही शिडाची नौका (सेल बोट) खोल समुद्रात दूरवर जाऊ शकते. हॉलँडच्या टोंगा-५६ या डिझाइनवर आधारित गोव्याच्या अॅक्वेरियस शिपयार्डमध्ये तिची निर्मिती झाली आहे.

– यासाठी फायबर ग्लास, अॅल्युमिनियम आणि स्टील या धातूंचा वापर केला गेला आहे. आयएनएसव्ही तारिणी ५५ फूट लांबीची शिडाची नौका आहे आणि त्याचे वजन २३ टन आहे.

– अत्याधुनिक सॅटेलाइट यंत्रणेद्वारा तारिणीवरील कर्मचारी जगाच्या कोणत्याही भागातून संपर्क करू शकतात.

– ३० जानेवारी २०१७ रोजी या जहाजाच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या गेल्या.

– ओडिशातील सुप्रसिद्ध तारातारिणी मंदिराच्या नावावरून या नौकेचे नाव ठेवले गेले आहे. तारिणी या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये दुसऱ्या तीरावर नेऊन पोहोचवणारी नौका असा आहे.