सरकारला अंधारात ठेवून तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांनी १९९९ मध्ये भारताबरोबर छेडलेल्या कारगिल युद्धाची आखणी केल्याचा दावा केला जात असतानाच या सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तान संसदेत विद्यमान विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ शरीफ गटाने केली आहे. १९९९ मध्ये कारगिलचे युद्ध झाले तेव्हा नवाझ शरीफ यांचे सरकार पाकिस्तानात सत्तेवर होते.
जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या अत्यंत जवळचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीने अलीकडेच कारगिल युद्धाबाबतच्या आखणीचे गुपित उघड केले होते. ही बाब लक्षात घेतल्यास न्यायालयीन आयोग स्थापन करून त्याद्वारे कारगिल संघर्षांच्या चौकशीची मागणी करणे, याशिवाय दुसरा पर्याय आमच्यापुढे नसल्याचे पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ शरीफ गटाचे ज्येष्ठ नेते चौधरी निसार अली खान यांनी गुरुवारी पाकिस्तानी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. १९९९ मधील कारगिल युद्धात पाकिस्तानचे ५०० हून अधिक सैनिक मारले गेले होते. तरुण व वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश होता. मात्र असे असतानाही आजपर्यंत याबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. याउलट भारताने याबाबतची चौकशी पूर्ण करून काही वर्षांपूर्वीच त्यासंबंधीचा अहवाल जनतेसमोर खुला केला आहे, असे ते म्हणाले.
कारगिल युद्धाच्या वेळी आयएसआयच्या अ‍ॅनॅलिसिस विंगचे प्रमुख असलेल्या निवृत्त लेफ्टनंट जनरल शहीद अझीझ यांनी अलीकडेच आपल्या लष्करी कारकिर्दीवर एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात कारगिल युद्धाची आखणी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली चार लष्करी अधिकाऱ्यांनी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याला अनुसरूनच भाष्य करताना पाकिस्तान संसदेतील कनिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या खान यांनी ही मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawaz sharif group demand for judicial probe of kargil war
First published on: 01-02-2013 at 04:03 IST