दाढी काढायला नकार दिल्यामुळे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील दहा विद्यार्थ्यांची दिल्लीत सुरु असलेल्या राष्ट्रीय छात्र प्रबोधिनीच्या (एनसीसी) शिबिरातून हकालपट्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार त्यांना शिबीर सुरू असताना अचानकपणे दाढी काढण्याचा आदेश देण्यात आला. आम्ही याबद्दलचे विचारले असता केवळ शिस्तीचे कारण सांगण्यात आले. मात्र, आम्ही दाढी काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला शिबिरातून हाकलवून देण्यात आले, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. दिल्लीच्या रोहिणी परिसरात एनसीसीचे हे शिबीर सुरू आहे. शिबिरातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रविवारी रात्रभर विद्यार्थी याच परिसरात ठाण मांडून होते. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली बाजू मांडली. या प्रकारानंतर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांकडून भेदभावाचा निषेध करण्यासाठी आंदोलनही सुरू करण्यात आले आहे.

दिलशाद अहमद या विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, फक्त दाढी काढायला नकार दिल्यामुळे आम्हाला शिबिरातून हाकलवण्यात आले. मी यापूर्वी अनेक शिबिरांमध्ये सहभागी झालो आहे. मात्र, तेव्हा आमच्या दाढीवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. यावेळीही शिबिराच्या पहिल्याच दिवशी अर्ज भरताना दाढीला आमच्या समाजात धार्मिक महत्त्व आहे, ही बाब आम्ही नमूद केली होती. याबद्दल आक्षेप असेल तर आम्हाला तसे सांगण्यात यावे, असेही आम्ही अर्ज भरताना स्पष्ट केले होते. तेव्हा कोणीही याबद्दल काहीच बोलले नाही. मात्र, शिबिराच्या सहाव्या दिवशी अचानकपणे अधिकाऱ्यांनी आम्हाला दाढी काढून टाका अथवा शिबिर सोडून जा, असे सांगितले. तेव्हा आम्ही दाढी काढायची नाही, हे ठरवले. त्यामुळे आम्हाला शिबिर अर्धवट सोडावे लागणार होते. शिबिर सोडण्यापूर्वी आम्ही अधिकाऱ्यांकडे आऊट पास मागितला. जेणेकरून आम्ही शिबिर सोडून पळालो, असा कोणाचाही समज होऊ नये. त्याशिवाय आम्ही शिबिरातून बाहेर पडणार नाही, असेही आम्ही ठामपणे सांगितले. तेव्हा आम्हाला सामानासकट शिबिराबाहेर हाकलवण्यात आले, असे दिलशादने सांगितले.

तर दुसरीकडे या शिबिरातील अधिकारी कर्नल बी.एस. यादव यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना असे सांगितले की, हा केवळ शिस्तीचा मुद्दा होता. आम्ही त्यांचे सामान फेकून दिले नाही. आम्ही त्यांना फक्त एनसीसीच्या शिस्तीनुसार दाढी काढण्याचा आदेश दिला. मात्र, त्यांनी धार्मिक कारण देत नकार दिला. एनसीसीच्या शिस्तीत न बसणाऱ्या धार्मिक गोष्टींचे पालन करायचे असेल तर तुम्ही शिबिरातून निघून जाऊ शकता, असे आम्ही त्यांना सांगितले. मी गेली २६ वर्षे लष्करात आहे. याठिकाणी शीखांना वगळता प्रत्येकालाच क्लीन शेव्ह करावी लागते, असा नियम आहे, असे कर्नल बी.एस. यादव यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांनीही भारतीय सैन्याच्या काही नियमांना शीख समाज अपवाद असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सैन्यातील शीख जवानांना दाढी ठेवता येते आणि पगडीही घालता येते. तसेच एनसीसीच्या कायद्यात कुठेही दाढीसंदर्भात कोणतीही विशिष्ट सूचना देण्यात आलेली नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी नियम तपासून पुढील निर्णय घेऊ असे सांगितले.