नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीला मुस्लीम लीगचे नेते मुहम्मद अली जिना, काँग्रेस पक्ष आणि भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन जबाबदार होते असे ‘एनसीईआरटी’ने म्हटले आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘विभाजन विभीषिका स्मृति दिना’निमित्त ‘एनसीईआरटी’ने दोन विशेष मोड्यूल प्रसिद्ध केली. त्यामध्ये फाळणीसंबंधी भाष्य करण्यात आले आहे.
फाळणीनंतर काश्मीरची नवीन समस्या उभी राहिली आणि त्यामुळे देशाच्या परराष्ट्र धोरणासमोर आव्हान निर्माण झाले. तसेच यानंतर काही देश पाकिस्तानला मदत करत राहिले आणि काश्मीर समस्येच्या नावावर भारतावर दबाव टाकत राहिले असे या मोड्यूलमध्ये नमूद करण्यात आले आहे. यापैकी एक मोड्यूल इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आहे, तर दुसरे मोड्यूल इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांसाठी आहे.
फाळणीची पार्श्वभूमी सांगताना मोड्यूलमध्ये लिहिले आहे की, “चुकीच्या संकल्पनांमुळे भारताची फाळणी झाली. भारतीय मुस्लिमांचा पक्ष असलेल्या मुस्लीम लीगने १९४०मध्ये लाहोरमध्ये परिषद घेतली होती. त्यांचे नेते मुहम्मद अली जिना म्हणाले की हिंदू आणि मुस्लीम यांचे धार्मिक तत्त्वज्ञान, सामाजिक रुढी आणि साहित्य भिन्न आहे.” माउंटबॅटन यांनी फाळणीची तारीख जून १९४८पासून ऑगस्ट १९४७ अशी बदलली. त्यामुळे त्याची पुरेशी तयारी करायला वेळ मिळाला नाही. माउंटबॅटन यांनी घोडचूक केली, असे ‘एनसीईआरटी’ने म्हटले आहे.
फाळणीच्या दोन दिवसांनंतरही लाखो लोकांना आपण भारतात आहोत की पाकिस्तानात, हे समजत नव्हते. इतक्या मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा करण्यात होता, असे ‘एनसीईआरटी’ने म्हटले आहे. ‘आपल्या हयातीत आपल्याला पाकिस्तानची निर्मिती झालेली पाहायला मिळेल, असे वाटले नव्हते,’ या जिनांच्या उद्गारांना मोड्यूलमध्ये स्थान देण्यात आले आहे. दोन्ही मोड्यूलची सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१मध्ये ‘विभाजन विभीषिका स्मृति दिना’ची घोषणा करताना दिलेल्या संदेशाने करण्यात आली आहे.
अखेरीस, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली. पण ते कोणा एका व्यक्तीचे कृत्य नव्हते. भारताच्या फाळणीसाठी तीन घटक जबाबदार होते – ज्यांनी मागणी केली ते जिना; ज्यांनी फाळणी स्वीकारली ती काँग्रेस आणि त्याची अंमलबजावणी करणारे माउंटबॅटन. – ‘एनसीईआरटी’