काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींबरोबर झालेल्या चर्चेत शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही. पण भविष्यात काय घडेल ते आता सांगू शकत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शरद पवारांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबर १० जनपथ निवासस्थानी चर्चा केली.

शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार ? या प्रश्नावर त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झालेली नाही. त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनणार या चर्चेलाही पवारांनी पूर्णविराम दिला. आपण मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना-भाजपाची आहे.

मी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सध्या राज्यात भाजपाला अनुकूल स्थिती नसल्याचेही शरद पवार म्हणाले. सामनामधून सातत्याने भाजपाविरोधात लिखाण सुरु आहे. आम्ही पुन्हा भेटणार असून त्यानंतर तुम्हाला नेमके सांगू शकेन असेही शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना शिवसेनेकडून सातत्याने पक्षाची भूमिका मांडणारे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि शिवतीर्थावर शपथविधी होईल. शिवसेनेकडे १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

आज शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना शरद पवार यांना संजय राऊत यांनी केलेल्या १७० आमदारांच्या पाठिंब्यासंबंधी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी संजय राऊत यांनी १७० आमदारांचा आकडा कुठून काढला ते माहित नाही असे उत्तर दिले.