राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत देशाचे गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली यासंदर्भात शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकांउंटवरून माहिती देखील दिली आहे. ही भेट नेमकी कशासाठी घेतली, याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे देखील उपस्थित होते. मात्र, शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये भेटीचं कारण नमूद केलं असलं, तरी गेल्या काही दिवसांत शरद पवारांनी घेतलेल्या राजकीय भेटीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागे राजकीय संदर्भ असल्याचे तर्क महाराष्ट्रात काढले जात आहेत.

शरद पवारांचं ट्वीट

शरद पवारांनी ट्वीट करून या भेटीविषयी माहिती दिली आहे. “सर्वप्रथम मी अमित शाह यांचं देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं. या भेटीदरम्यान, आम्ही देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केली”, असं शरद पवारांनी नमूद केलं आहे.

 

आम्हाला आशा आहे, की सहकार मंत्री…!

या ट्वीटसोबत शरद पवार यांनी अमित शाह यांना दिलेल्या पत्राची प्रत देखील शेअर केली आहे. “आम्ही साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अमित शाह यांचं लक्ष वेधलं. यामध्ये साखरेला हमीभाव आणि साखर कारखान्यांच्या परिसरातच इथेनॉल मॅनिफॅक्चरिंग युनिट बसवणे या गोष्टींचा समावेश आहे. आम्हाला आशा आहे की या समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून सहकार मंत्र त्या सोडवण्यासाठी पावलं उचलतील”, असं आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी नमूद केलं आहे.

भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार यात शंका नाही”, अंजली दमानियांचं भाकित!

दरम्यान, शरद पवार यांच्या या भेटीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजकीय भाकित केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येणार यात काहीच शंका नाही. जसं लष्करी हल्ला किंवा माघार घेताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला कव्हर-अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपाविरुद्धच आहोत”, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.