‘ईव्हीएम’बाबत शंका; शरद पवार म्हणतात, …तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडेल

भाजपाच्या विजयामागे खरंच ईव्हीएम कारणीभूत ठरले तर लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल आणि लोकं कोणताही टोक गाठतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

ईव्हीएमवर शंका उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ईव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे मी ऐकून आहे. या सर्व गोष्टी चिंताजनक आहेत. यंदा भाजपा नेते सांगतात तसा अनपेक्षित निकाल लागला तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडेल आणि एकदा विश्वास उडाला की ते कोणत्याही टोकाला जातील, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी ईव्हीएमबाबत भाष्य केले आहे. शरद पवार म्हणतात, मी ईव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे ऐकून आहे. ईव्हीएममध्ये एक चिप असते आणि ती चिप बाहेर नेऊन ईव्हीएममध्ये मतांचे परिवर्तन करता येऊ शकते, असे मी ऐकून आहे. पण मला याबाबत ठोस माहिती नाही. मी याबाबतीतील तज्ज्ञदेखील नाही,  असे  पवारांनी नमूद केले. मध्य प्रदेशमध्ये ईव्हीएममध्ये कोणतेही बटन दाबले तरी कमळालाच मत जाते, अशी बातमी माझ्या वाचनात आली होती. या सर्व गोष्टी चिंता निर्माण करणाऱ्या आहेत, असे शरद पवारांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांच्यासारखी न निवडून येणारी लोकंही जेव्हा भाजपाचा विजय निश्चित असल्याचे सांगतात. तेव्हा  ही लोक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नियोजन करतात की काय अशी शंका अनेकांना येते. पण माझ्याकडे याबाबत ठोस माहिती नाही, असे शरद पवार म्हणाले.

भाजपाचे नेते देशात यंदा अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागतील असा दावा करत आहेत. यात बारामतीचाही समावेश असेल, असे भाजपा नेते सांगतात. असा निकाल लागेल का, असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, अनपेक्षित निकाल लागले तर लोकांचा मतदानावरील विश्वास उडेल आणि ते कोणत्याही टोकाला जातील. आपल्याला संसदीय लोकशाहीचे रक्षण करायचे आहे. यात निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे, असे पवारांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp chief sharad pawar reaction on evm and bjp in baramati