टाइम्स नाऊचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी १०० कोटी रूपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. अर्णव गोस्वामी आपल्या कार्यक्रमात असभ्य भाषा वापरत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. सहा ऑक्टाेबरच्या रात्री ९ वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘खून की दलाली’ या वादग्रस्त वक्तव्यावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात अर्णव यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाहक आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे आमच्या अशिलाच्या प्रतिमेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी नोटिसीत केला आहे. टाइम्स नाऊने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मोहीम चालवली असून अर्णव गोस्वामी यांनी आव्हाड यांची माफी मागावी अशी मागणीही नोटिसीत करण्यात आली आहे.
फर्स्टपोस्टने दिलेल्या वृत्तानुसार अर्णव यांच्याशिवाय टाइम्स नाऊच्या ब्यूरो चीफ मेघा प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश कौल, टाइम्स ग्लोबल ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेडचे अधिकारी सुनील लुल्ला आणि टाइम्स ग्लोबल ब्रॉडकास्टिंग कंपनालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
अर्णव हे खोटारडे आहेत. ते कधीही समोरच्या व्यक्तीस बोलण्याची संधी देत नाहीत. ते नेहमी कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचा अपमान करतात. मीच एकटा खरा आहे, बाकी सगळे खोटे बोलतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यांना धडा मिळावा म्हणूनच मी खटला दाखल केला आहे. त्यांनी थेट प्रक्षेपणात मला शिवी दिली. मी ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
VIDEO: या कार्यक्रमात झाला होता आमदार जितेंद्र आव्हाड आणि अर्णव गोस्वामी यांच्यात वाद. आव्हाड व गोस्वामी यांच्यातील वादाचा क्षण १८.२० या वेळेस पाहायवयास मिळेल.