‘सीएएसे आझादी’ ‘एनआरसीसे आझादी’ अशा घोषणा देत पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा सहभाग होता. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकरही या मोर्चात सहभागी झाले होते. संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करुन या मोर्चाला सुरुवात झाली. मशाल पेटवून हलगीच्या तालावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या युवकांनी आणि युवतींनी मोर्चात घोषणाबाजीही केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना हिटलरशी करणारे फलक यावेळी मोर्चातल्या विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. तसेच काही फलकांवर देशाच्या घटनेच्या हेतूलाच सुरुंग लावला जातो आहे असाही मजकूर होता. सावित्रीबाई फुले विद्यापीठापासून निघालेला हा मोर्चा जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी आला तेव्हा युवक-युवतींनी गाणी सादर केली आणि त्यानंतर या मोर्चाचा समारोप झाला. सोमवारी विद्यापीठातील पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केलं होतं. त्यानंतर मंगळावारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. आज म्हणजेच बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं.

खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“भाजपा सरकारने संविधान विरोधी कायदा केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करण्याची, देश वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र संघर्ष करतो आहे. मात्र हा संघर्ष आम्ही सुरु ठेवू आणि स्वाभिमानाने जगू. हा कायदा रद्द करुन देशाची शान टिकली पाहिजे. आंदोलन करताना काही जण उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तरीही ते शांततेत झालं पाहिजे असंच मला वाटतं.”