राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत त्यांच्या परदेश दौऱ्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचे शतक पूर्ण होत असून यामधून काय साधले असा सवाल राष्ट्रवादीने पंतप्रधानांना विचारला आहे.

‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ म्हणत मागील दीड महिन्यापासून राष्ट्रवादीकडून राज्य आणि केंद्र सरकारला #जवाबदो हॅशटॅग वापरून रोज एक प्रश्न विचारला जात आहे. आजचा ४२वा प्रश्न उपस्थित करताना राष्ट्रवादीने मोदींच्या परदेश दौऱ्यावर काही हजार कोटी खर्च झाला मात्र त्यातून देशाला काय फायदा झाला असा प्रश्न उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये, “पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवर जवळजवळ एक हजार ४७४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता विदेश दौऱ्यांचे शतकही पूर्ण होईल. या विदेश दौऱ्यांमुळे देशाला नक्की काय फायदा झाला आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करण्यात आले आहे. तसेच या ट्विटबरोबर एक व्यंगचित्र ट्विट करण्यात आले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी परदेश दौऱ्यांचे शक्तीशाली आवरण परिधान केल्याचे दाखवण्यात आले असून हातात मात्र परदेश दौऱ्यांचे अपयश दाखवण्यात आले आहे. एका पोडियम समोर पंतप्रधान मोदी भाषण देताना दाखवण्यात आले असून ते १४७४ कोटी रुपये आणि दौऱ्यांचे शतकावर उभे असल्याचे व्यंगचित्रात दिसत आहे.

पंतप्रधान मोदींने मागील चार वर्षांमध्ये ८६ देशांना भेट दिली आहे. ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी जुलै महिन्यामध्ये त्यांनी रेवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती. राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये सरकारने मोदींच्या परदेश दौऱ्यांवर चार वर्षांमध्ये एक हजार ४७४ कोटी रुपये खर्च करण्यात आला. मोदींच्या आधी पंतप्रधान पदावर असणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या आपल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा आकडा मोदींच्या चार वर्षाच्या कार्यकाळातील खर्चाच्या अर्ध्याहूनही कमी आहे. पुढील महिन्यामध्ये जी-२० परिषदेसाठी मोदी अर्जेंटिनाला रवाना होणार आहेत.