लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने पुन्हा एकदा केंद्रात सत्ता काबीज केल्यानंतर शनिवारी दिल्लीत ‘एनडीए’च्या  संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.  मोदी त्सुनामीने विरोधकांना उद्ध्वस्त केले, असे अमित शाह यांनी सांगितले.

लोकसभा मतदारसंघनिहाय अधिकृत निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यानंतर शनिवारी भाजपा आणि घटक पक्षांचे खासदार दिल्लीत पोहोचले. ‘एनडीए’च्या संसदीय दलाची दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएतील घटकपक्षांचेही खासदार उपस्थित होते. ‘एनडीए’च्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड करण्याच्या निर्णय घेण्यात आला. संसदीय नेतेपदी निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे आशीर्वाद घेतले.

उपस्थितांचे आभार मानताना अमित शाह म्हणाले, एनडीएचे ३५३ खासदार निवडून आले असून यातून जनतेचा मोदींवरील विश्वास दिसून येतो. प्रचारादरम्यान अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले, पण आम्हाला आणि आमच्या मित्रपक्षांना विश्वास होता की आम्ही ५० टक्के जागांवर यशस्वी होऊ. देशाच्या मतदारांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. जनतेच्या मनात राग होता की दहशतवादाविरोधात कारवाई केली जात नाही. पण मोदी सरकार आल्यावर जनतेला लक्षात आले की असा नेता सत्तेत आला आहे की जो दहशतवाद्यांवर त्यांच्या घरात घुसून कारवाई करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९६० च्या दशकात लोकशाहीला घराणेशाही, जातीवाद आणि लांगुलचालन या तीन गोष्टींनी ग्रासले होते. प्रत्येक वेळी हीच परिस्थिती दिसून यायची. पण २०१९ मधील जनादेशाने घराणेशाही, जातीवाद आणि लांगुलचालनाला राजकारणातून बाहेर फेकले, असेही अमित शाह यांनी सांगितले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ठिकाणी जनतेने मोदींना मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत मोदी त्सुनामीने विरोधकांना उद्ध्वस्त केले, असा दावाही त्यांनी केला.