राज्यांना भेडसावणाऱ्या नक्षली कारवायांचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी एनसीटीसीच्या तरतुदींबाबत अधिक समीक्षा करण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केले.
अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विशेष परिषदेत मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, नक्षलवादविरोधी मोहिमेसाठी संयुक्त कारवाई करताना ती परिणामकारक तसेच पारदर्शक व्हावी या दृष्टीने प्रस्तावित मसुद्यातील परिच्छेद ५.२ आणि ५.३ बाबत अधिक समीक्षा होणे गरजेचे आहे.
५.२ परिच्छेदानुसार, दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या मार्गदर्शनाखाली राज्य पोलीस कारवाई करतील. मात्र कारवाईत सुसूत्रता यावी यासाठीच मसुद्यातील तरतुदींची आणखी समीक्षा होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारला अधिकाधिक मदत करता यावी यासाठी राज्यांच्या गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली. याशिवाय ग्रामीण भागात नक्षलवादी संघटना सरकारविरोधात स्थानिक भाषांमधून नागरिकांना भडकावतात. अशा वेळी केंद्राने एफएम रेडीओ केंद्र उभारून स्थानिक भाषेतील कार्यक्रमांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे विकासाला मारक ठरणाऱ्या कारवाया आणि नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी राबवण्यात येणारी दहशतवादविरोधी मोहीम महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची मते
ही दुबळी कल्पना
राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राच्या नवीन मसुद्याची व्याप्ती काय असेल, याअंतर्गत कोणत्या सुरक्षा दलांचा समावेश असणार आहे, एनसीटीसी कशाप्रकारे काम करणार आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट कल्पना येत नाही.
– नरेंद्र मोदी, गुजरात
लादण्याचा केंद्राचा प्रयत्न
दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी एनसीटीच्या प्रस्तावाला मोठय़ा प्रमाणात विरोध असतानाही केंद्र सरकार एनसीटीसी लागू करण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत आहे. मात्र एनसीटीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतहीअनेक अडचणी आहेत. त्यामुळे वारंवार एनसीटीसीसाठी आग्रह धरणाऱ्या केंद्राचा राज्य सरकारांवर विश्वास नाही का? सध्या देशापुढे डाव्या विचारसरणीचे नक्षलवादी आणि दहशतवाद यांचे मोठे संकट आहे. अशावेळी केंद्र सरकारने राज्यांना अधिकाधिक आर्थिक मदत पुरवून त्यांची यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याची गरज आहे.
– शिवराज सिंग चौहान, मध्यप्रदेश
संघराज्य रचनेला धोका
एनसीटीसीमुळे घटनात्मक संघराज्य रचनेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. एनसीटीसी संसदेकडून मंजूर होण्याची गरज आहे. शिवाय राज्यांशी सल्लामसलत न करता थेट कारवाईचे अधिकार एनसीटीसीला देऊ नयेत. एनसीटीसी लागू करताना त्यामध्ये राज्यांची भूमिका महत्वाची असली पाहिजे.य्ोाबाबतीत राज्यांचे अस्तित्व केवळ कागदावर राहू नये.
– रमण सिंग, छत्तीसगढ
एनसीटीसी सदोष
केंद्र सरकारच्या एनसीटीच्या सुधारित मसूद्यातही अनेक दोष असून मनमानी तरतूदी त्यात करण्यात आल्या आहेत. अमलबजावणी आधी त्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे.
– नितीश कुमार, बिहार
अमर्याद अधिकार देऊ नयेत
नक्षलवादी चळवळ राज्यातील सुरक्षा व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या एनसीटीसीला अंतिम स्वरूप देण्याआधी त्याबाबत आवश्यक सुधारणा करण्याची गरज आहे. एनसीटीसीला अमर्याद अधिकार देऊन राज्यांची अडचण करू नये.
– सिद्दरामय्या, कर्नाटक
एनसीटीसी आवश्यक
छत्तीसगडमधील नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्याने दहशतवादाचा भयानक चेहरा जगासमोर आला. त्यामुळे अशा कारवायांचा बिमोड करण्यासाठी एनसीटीसी सारखी यंत्रणा अत्यावश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या मुद्दय़ावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. – भुपींदरसिंह हुड्डा, हरयाणा