Gen Z Revolution Nepal Social Media Ban: सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हजारोंच्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यात बहुतांश प्रमाण हे Gen Z युवकांचं होतं. नेपाळ सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा या युवकांना प्रचंड संताप आला होता. हा निर्णय होता जवळपास २६ लोकप्रिय सोशल मीडिया साईट्स बॅन करण्याचा! सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हे तरुण तीव्र निदर्शनं करताना काठमांडीच्या रस्त्यांवर दिसून आले. या निदर्शकांवर नेपाळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता न्यू बनेश्वरजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या कारवाईचाही हे युवक निषेध करताना दिसत आहेत.
नेपाळमध्ये नेमकं काय घडलंय?
नेपाळने सोमवारपासून जवळपास सर्वच लोकप्रिय सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. यामध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, सिग्नल, वी चॅट अशा प्रचलित सोशल मीडिया साईट्सचाही समावेश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे युवक, प्रामुख्याने जेनझी (२००० सालानंतर जन्माला आलेले आणि सध्या विशीत असणारे युवक) रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाविरोधात व प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात निदर्शनं करू लागले आहेत. संतप्त जमावाने नेपाळच्या संसदेच्या दिशेनं मोर्चादेखील काढला. यावेळी पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. काही ठिकाणी पोलिसांनी गोळीबार केला असून त्यात काही युवक दगावल्याचंही सांगितलं जात आहे.
के पी शर्मा ओली सरकारचा निर्णय कारणीभूत
युवकांचा मोर्चा आज निघाला असला, तरी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने पाच दिवसांपूर्वीच जवळपास २६ सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. ऑनलाईन वर्तनावर देखरेख ठेवण्यासाठी नेपाळ सरकारकडून लवकरच एक कायदा आणण्यात येणार आहे. या कायद्याच्या अनुषंगाने सर्व सोशल मीडिया साईट्सने नेपाळ सरकारशी याबाबतचा करार करून त्यांच्या सर्व युजर्सची माहिती देखरेखीसाठी नेपाळ सरकारला उपलब्ध करून द्यावी, असे आदेश नेपाळ सरकारने दिले. पण हे आदेश मानण्यास या साईट्सच्या व्यवस्थापनाने नकार दिल्यानंतर नेपाळ सरकारने या साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सर्वच सोशल मीडिया साईट्सवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर नेपाळमधील तरुणाई टिकटॉकच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. सरकारमधील भ्रष्ट मंत्री व अधिकाऱ्यांनी त्यांची मालमत्ता व कमाईचे मार्ग जाहीर करावेत, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आंदोलक तरुणांना आवाहन केलं आहे. “मला आशा आहे की कायद्याचं उल्लंघन केल्याचे काय परिणाम होऊ शकतात हे तरुण समजून घेतील”, असं ते म्हणाले.
काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू
दरम्यान, काही आंदोलक हिंसक झाल्यानंतर नेपाळ पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्जदेखील करावा लागला. परिस्थिती चिघळल्याचं लक्षात येताच काठमांडू जिल्हा प्रशासनाने न्यू बनेश्वरमध्ये व आसपासच्या भागात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी का?
दरम्यान, सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्यामागची आपली भूमिका नेपाळ सरकारने स्पष्ट केली आहे. या साईट्सवर काही युजर्स खोटी ओळख वापरून द्वेषपूर्ण मेसेजेस व्हायरल करत आहेत. खोट्या बातम्या पसरवत आहेत. तसेच, अशा साईट्सवरून इतर काही गुन्हेही घडत आहेत, असं नेपाळ सरकारकडून सांगण्यात आलं आहे. याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमध्ये अगदी शाळेत असणाऱ्या किशोरवयीन मुलांपासून महाविद्यालयांमधील तरुणांचाही समावेश आहे. शाळा-महविद्यालयाच्या गणवेशातच ही तरुणाई नेपाळच्या संसदेच्या दिशेनं निघालेल्या मोर्चामध्ये निदर्शनं करताना दिसून आली. “भ्रष्टाचार बंद करा, सोशल मीडिया साईट्स नाही”, अशा घोषणा आंदोलक देत आहेत.