वृत्तसंस्था, काठमांडू
नेपाळ पार्लमेंटची निवडणूक पुढील वर्षी मार्च महिन्यात होईल अशी घोषणा अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्या कार्यालयाने शनिवारी केली. सुशीला कार्की यांनी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान म्हणून शुक्रवारी शपथ घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. समाजमाध्यमांवरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थी आणि तरुणांनी केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर नेपाळमध्ये हंगामी सरकार स्थापन करण्यात आले आहे.
हंगामी पंतप्रधान कार्की यांच्या शिफारशीवरून पौडेल यांनी पार्लमेंटचे ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ हे कनिष्ठ सभागृह बरखास्त केले. त्यावेळी त्यांनी पुढील पार्लमेंट निवडणूक ५ मार्च रोजी घेतली जाईल असे जाहीर केले. नेपाळचे मुख्य राजकीय पक्ष आणि वकिलांच्या सर्वोच्च संघटनेने सभागृह बरखास्त करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. “हा निर्णय असंवैधानिक, मनमानी आणि लोकशाहीसाठी धक्कादायक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या निदर्शनांदरम्यान झालेल्या जाळपोळीत सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. “ही कागदपत्रे आमच्या न्यायिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग होते,” असे नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान कार्की रविवारी लहान मंत्रिमंडळ स्थापन करतील असे अध्यक्षांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. गृह, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण या महत्त्वाच्या खात्यांसह वीसपेक्षा जास्त खात्यांचा कारभार पंतप्रधान कार्की स्वतःच पाहतील. निदर्शनांदरम्यान सिंहदरबार सचिवालयातील पंतप्रधानांचे कार्यालय पेटवण्यात आले होते. त्यामुळे सिंहदरबार संकुलातील गृह मंत्रालयाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत पंतप्रधानांचे कार्यालय हलवण्यात येईल अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, कार्की यांनी शनिवारी काठमांडूच्या बनेश्वर भागातील सरकारी रुग्णालयाला भेट दिली आणि निदर्शनांदरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली.
संचारबंदी मागे
काठमांडू खोरे आणि नेपाळच्या अन्य भागात जनजीवन पूर्ववत होत असून संचारबंदी आणि प्रतिबंधक उपायांचे आदेश शनिवारी मागे घेण्यात आले. अनेक दिवस बंद असलेली दुकाने, किराणा मालाची दुकाने, भाजीबाजार आणि शॉपिंग मॉल शनिवारी उघडले. तसेच रस्त्यावरील वाहतूकही सुरू झाली. त्याशिवाय जाळपोळ आणि नासधूस झालेल्या सरकारी इमारतींसह अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
मोदींकडून अभिनंदन
इम्फाळ : सुशीला कार्की यांची नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचे अभिनंदन केले. कार्की यांची नियुक्ती हे महिला सक्षमीकरणाचे लखलखते उदाहरण आहे, असे मोदी म्हणाले. मणिपूरमध्ये जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले की, “भारत आणि नेपाळ हे घनिष्ठ मित्र असून दोन्ही देश समान इतिहास, श्रद्धा आणि सांस्कृतिक बंध यांनी एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहेत.”
मी १४० कोटी भारतीयांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. नेपाळमध्ये शांतता, स्थैर्य आणि समृद्धी आणण्यासाठी त्या मार्ग शोधतील याची मला खात्री आहे. नेपाळच्या या संक्रमणाच्या काळात आम्ही नेपाळी जनतेच्या बरोबर आहोत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान