नेपाळच्या यति एअरवेजचे प्रवाशी विमान रविवारी सकाळी ११ च्या सुमारास नुकत्याच उद्घाटन झालेल्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घनाग्रस्तामध्ये पाच भारतीयांचा समावेश आहे. विमानात चार कर्मचाऱ्यांसह ७२ जण प्रवास करत होते.

पाच भारतीयांपैकी चौघेजण उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथील रहिवासी होते. अभिषेक कुशवाह (२५), विशाल शर्मा (२५), अनिल कुमार राजभर (२५) आणि सोनू जयस्वाल (३०) अशी चार मित्रांची नावे आहेत. हे चौघेजण काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. सोनू जैस्वाल व्यापारी असून वाराणसीत राहत होता. तर, अनिल राजभर हा जैनबचा रहिवासी होता. तर, कुशवाह हा धारवा नॉनहरा परिसरीतल धारवा येथे राहत होता. राजभर आणि कुशवाह हे गाझीपूरमध्ये जनसेवा केंद्र चालवत होते. तर, शर्मा एका खाजगी कंपनीत काम करत होता.

आणखी वाचा – …अन् ते हास्य शेवटचं ठरलं,” अपघातग्रस्त विमानातील हवाईसुंदरीचा व्हिडीओ व्हायरल!

याबाबत बोलताना सोनू जयस्वालचे वडिल राजेंद्र जयस्वाल यांनी सांगितलं की, “सोनू त्याची पत्नी रागनी आणि तीन मुले अलीकडेच वाराणसीला राहण्यास गेले होते. नेपाळमध्ये विमान कोसळल्याची माहिती मिळाली तेव्हा, सोनू फेसबुक लाईव्ह करत होता, हे समजलं. विमानातील त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. “

“शनिवारी सोनूच्या पत्नीला फोन करुन त्याच्याबद्दल विचारल होतं. तेव्हा, सोनू सुखरूपपणे नेपाळला पोहचला असून, लवकरच माघारी येणार असल्याचं तिने सांगितलं. अनेक दिवसांपासून सोनू पशुपतीनात मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार करत होता. त्यानंतर चौघेजण नेपाळला गेले होते,” असं राजेंद्र जयस्वाल यांनी म्हटलं.

आणखी वाचा – नेपाळमधील अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला, दुर्घटनेचे नेमके कारण येणार समोर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नेपाळमधील सरलाही जिल्ह्यातील अजय कुमार यांनी पीटीआयला सांगितलं की, “चौघेजण भारतातून एकाच वाहनाने एकत्र आले होते. पोखरामध्ये पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्याचा त्यांचा विचार करत होता. त्यानंतर पोखराहून गोरखपूरमार्गे भारतात परतण्याचा त्यांचा विचार होता.”