नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी येती एअरलाईन्स एअरक्राफ्ट या कंपनीच्या विमानाला मोठा अपघात झाला. विमानातील ६८ प्रवाशी आणि चार केबिन क्रू सदस्य यांचा जागीत मृत्यू झाला. ज्यामध्ये पाच भारतीय नागरिक होते. यामध्ये विमानाच्या को पायलट अंजू खतिवडा यांचाही मृत्यू झाला आहे. को पायलट म्हणून त्यांची ही शेवटची जबाबदारी होती. यशस्वी लँडिंग झाल्यानंतर त्या मुख्य पायलट अर्थात कॅप्टन बनणार होत्या. मात्र मुख्य पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न दुर्दैवाने भंग झाले आहे. विशेष म्हणजे १७ वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचे विमान दुर्घटनेतच निधन झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्य पायलट होण्यासाठी कमीत कमी १०० तासांचा फ्लाईंग अनुभव असणे गरजेचे असते. को पायलट अंजू यांनी याआधी नेपाळच्या जवळपास सर्वच विमानतळावर यशस्वी लँडिंग केले होते. रविवारी पोखरासाठी उड्डाण घेतल्यानंतर कॅप्टन कमल केसी यांनी अंजू यांना मुख्य पायलटच्या स्थानावर बसवले होते. यशस्वी लँडिंगनंतर अंजू यांना मुख्य पायलट होण्याचा परवाना मिळणार होता. मात्र लँडिंगच्या केवळ १० सेकंद आधी अंजूच्या स्वप्नांचा चुराडा झाला. विमानातील एकही जण या भीषण अपघातात वाचू शकला नाही.

हे वाचा >> लँडिंगच्या १० सेकंद आधी घडलं विपरीत, विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा दुर्दैवी अंत

मिळालेल्या माहितीनुसार मुख्य पायलट कॅप्टन कमल केसी यांच्याकडे पायलट म्हणून ३५ वर्षांचा अनुभव होता. केसी यांनी याआधी देखील अनेक पायलटना प्रशिक्षित केले होते. त्यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक पायलट आज यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखले जातात. नेपाळमध्ये विमान दुर्घटनेची आकडेवारी पाहिली तर धक्कादायक आकडे समोर येतात. आजवर एकूण १०४ अपघातांपैकी ९६ प्रवाशी विमान आणि ८ हॅलिकॉप्टर दुर्घटनांचा समावेश आहे.

हे वाचा >> …अन् त्यानं स्वत:चा मृत्यूच कॅमेऱ्यात केला कैद, नेपाळमधील विमान दुर्घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO

१६ वर्षांपुर्वी पतीचेही विमान दुर्घटनेत मृत्यू

दुर्दैवी योगायोग म्हणजे को पायलट अंजू यांच्या पतीचे निधन देखील विमान अपघातामध्ये झाले होते. त्यांचे पती दीपक पोखरेल येती एअरलाईन्स एअरक्राफ्टचे (Yeti airlines aircraft) को पायलट होते. १६ वर्षांपूर्वी २१ जून २००६ मध्ये एका विमान दुर्घटनेत अंजू यांच्या पतीचे निधन झाले. नेपालगंज मधून सुर्खेत मार्गे जुम्ला याठिकाणा जाणाऱ्या 9N AEQ या विमानाचा अपघात झाला होता. ज्यामध्ये ६ प्रवाशी आणि ४ क्रू सदस्यांचा मृत्यू झाला.

हे वाचा >> विश्लेषण : नेपाळमध्ये हवाई वाहतूक धोकादायक का आहे?

असा झाला अपघात, १० सेकंदात सर्व काही नष्ट

आजच्या पोखरा येथील दुर्घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बचाव कार्यात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. उद्या १६ जानेवारी रोजी देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal plane crash co pilot anju khativada lost her life 16 years ago her husband died same kvg
First published on: 15-01-2023 at 19:21 IST