Air India Plane Crash New Video: अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाने आज दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी लंडनसाठी उड्डाण घेतले. मात्र या विमानाचा भीषण अपघात झाला. उड्डाण झाल्यानंतर काही मिनिटांनी अपघात झाल्याची शक्यता आधी वर्तविण्यात येत होती. मात्र आता विमानतळावरील नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विमानाने रनवे वरून उड्डाण घेतल्यानंतर ते अपघात होईपर्यंतचा क्षण कैद झाला आहे.

नव्याने समोर आलेला व्हिडीओ अवघ्या ३२ सेकंदाचा आहे. यात विमान जेव्हा रनवे वरून हवेत जाते, त्यानंतर अवघ्या ३० सेकंदात विमानाचा स्फोट झाल्याचे दिसते. विमान हवेत थोड्याच उंचीवर गेल्यानंतर पुन्हा खालच्या दिशेने येऊ लागते आणि काही कळण्याच्या आताच कोसळते.

या व्हिडीओच्या माध्यमातून सदर दुर्घटना किती भीषण आहे, याची जाणीव होते. विमानातील प्रवाशी आणि केबिन क्रू सदस्यांना काही कळण्याच्या आतच विमानाचा भीषण अपघात घडला.

एअर इंडियाच्या विमानात दोन वैमानिकांसह दहा क्रू सदस्य होते. तर इतर २३२ प्रवाशी असे एकूण २४२ लोक होते. यातील एक प्रवासी वगळता सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला

विमानातील २४२ प्रवाशांपैकी रमेश विश्वासकुमार हे एकमात्र प्रवासी या अपघातामधून बचावले आहेत. ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. रमेश विश्वासकुमार हे ब्रिटिश नागरिक आहेत.