सागरी जलाचे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये रूपांतर करून नंतर त्याचा वापर वीज निर्मितीच्या इंधनघटात करण्याचे तंत्रज्ञान शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. प्रकाशाचा वापर करून सागरी जलाचे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये रूपांतर करता येते. प्रकाशउत्प्रेरक पद्धतीने हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ असून त्याची कार्यक्षमताही जास्त आहे त्यामुळे हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर इंधन घटात करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीवर सागरी जल सर्वात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. सागरी पाण्याचा वापर करून हायड्रोजन पेरॉक्साईडचा इंधन घट तयार करता येतो, असे जपानच्या ओसाका विद्यापीठातील शुनीची फुकुझुमी यांनी सांगितले. वैज्ञानिकांनी या प्रयोगात नवीन प्रकाशविद्युत रासायनिक घट (सेल) तयार केला असून तो हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती करणारा सौरघटच आहे. जेव्हा सूर्यप्रकाश प्रकाश उत्प्रेरकावर पडतो तेव्हा तो फोटॉन म्हणजे प्रकाश कण शोषून घेतो व नंतर त्या ऊर्जेचा वापर करून रासायनिक अभिक्रिया सुरू करतो, सागरी जलाचे ऑक्सिडीकरण व ऑक्सिजनचे कमी होणे यामुळे हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती होते. २४ तास हा सेल किंवा घट प्रकाशात ठेवला असता हायड्रोन पेरॉक्साईडची सागरी जलातील संहती ४८ मिलीमोलर होते. यापूर्वी शुद्ध पाण्यातही हायड्रोजन पेरॉक्साईडचे मूल्य २ मिलीमोलर मिळवण्यात यश आले होते, असे फिजीक्स डॉट ओआरजीने म्हटले आहे. संशोधकांच्या मते सागरी जलातील ऋणभारित क्लोरिन हा प्रकाश उत्प्रेरकाची क्रियाशीलता वाढवतो व जास्त हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती करतो. एकूण सौरऊर्जा ते विद्युत ऊर्जा रूपांतराची कार्यक्षमता ०.२८ टक्के राहते. स्वीचग्रास या अमेरिकेतील प्रेअरीजमध्ये आढळणाऱ्या गवताची ही क्षमता ०.२ टक्के आहे. असे असले तरी ही क्षमता पारंपरिक सौरघटांपेक्षा कमी आहे. संशोधकांच्या मते सौरऊर्जेतून विद्युत ऊर्जेत रूपांतराची कार्यक्षमता प्रकाशविद्युतरासायनिक घटात (सेल) आणखी चांगले पदार्थ वापरून वाढवता येऊ शकते व उत्पादन खर्चही कमी करता येऊ शकतो. नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New method developed electricity generation from marine burns
First published on: 24-05-2016 at 03:06 IST