कर्करोगाचे रूग्ण केमोथेरपीला कसा प्रतिसाद देत आहे हे आता रक्ताच्या एका चाचणीने समजू शकणार आहे. त्यामुळे केमोथेरपीचा जास्त वापर टाळणे शक्य होणार आहे. प्रत्येक रूग्णानुसार केमोथेरपीचे प्रमाण बदलता येते. पण ही चाचणी ‘हॉजकिन लिंफोमा’साठीच मर्यादित आहे.
क्वीन्सलँड इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रीसर्चच्या (क्यूएमआयआर) वैज्ञानिकांनी ही रक्ताची चाचणी शोधून काढली आहे. माहीर गांधी व किंबर्ले जोन्स यांनी हे संशोधन केले आहे. इम्युनोहेमॅटोलॉजी या प्रयोगशाळेत त्यांनी विकसित केलेल्या चाचणीमुळे रक्ताच्या कर्करोगात व्यक्तीसापेक्ष उपचार शक्य होणार आहेत. त्यामुळे केमोथेरपीची मात्रा कमी-अधिक प्रमाणात रूग्णानुसार वापरता येईल.
गांधी यांनी सांगितले की, या रक्तचाचणीचा उपयोग डॉक्टरांना केमोथेरपीची मात्रा ठरवण्यात होणार आहे. केमोथेरपीचा परिणाम नेमका किती होत आहे हे तपासण्यासाठी स्कॅनचा वापर केला जात असतो, पण यात त्याशिवायच परिणाम तपासता येणार आहे. स्कॅनिंग हे खर्चिक असते. ते उपचार सुरू करण्यापूर्वी व शेवटी उपचार संपल्यावर असे दोनदाच केले जाते. रक्ताची चाचणी मधल्या टप्प्यांवर करता येणार आहे. ऑस्ट्रेलियात दरवर्षी ४०० रूग्णांना हॉजकिन लिंफोमा या कर्करोगाचे निदान होते. त्यात पुरूषांचा समावेश स्त्रियांपेक्षा जास्त असतो, प्रौढ व तरूणांना तो होऊ शकतो.
क्यूएमआयआरच्या वैज्ञानिकांना असे दिसून आले की, ‘सीडी १६३’ नावाचे प्रथिन हे हॉजकिन लिंफोमा असलेल्या रूग्णांच्या रक्तद्रवात वाढलेले असते व जर केमोथेरपीने गाठ कमी होत गेली तर त्याचे प्रमाण चाचणीत कमी झालेले दिसते.
केमोथेरपी औषधे ही विषारी असतात व जेवढी जास्त वापराल तेवढा त्यांचा वाईट परिणाम शरीरावर होतो. या प्रथिनाची चाचणी अगदी साधी आहे, त्यातून केमोथेरपीचा किती उपयोग होतो हे समजते., त्यातून अधिक व्यक्तिगत स्वरूपाच्या औषधयोजना करता येतील असे जोन्स यांनी सांगितले. ऑस्ट्रलशियन ल्युकेमिया लिंफोमा गट व इंग्लंडमधील डॉक्टर समुदाय यांच्या संयुक्त विद्यमाने या संदर्भात आणखी अभ्यास केला जाणार आहे.