जागतिक तपमानवाढीमुळे पृथ्वीवरील हवामान बदलत आहे, त्यामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणाऱ्या अन्नाधान्याच्या प्रजाती तयार करण्याचे काम सुरू आहे.
  अलिकडेच संशोधकांनी पुराच्या पाण्यातही वाढू शकेल, अशी बार्ली म्हणजे जवाची प्रजात तयार केली आहे. इंग्लंडमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी यापूर्वी कमी ऑक्सिजनवर जगणारी वनस्पतींची प्रजात तयार केली होती. तीही प्रतिकूल हवामानात जगू शकणारी प्रजात होती. आताच्या संशोधनात प्रगत तंत्र वापरून पुरामुळे बार्लीच्या उत्पादनाचे होणारे नुकसान टाळण्यात आले आहे.
 स्कूल ऑफ बायोसायन्सेसचे प्राध्यापक मायकेल होल्डसवर्थ यांनी सांगितले, की पुराच्या पाण्यात किंवा पाणथळ जागेत वाढू शकेल अशी बार्लीची प्रजात आम्ही तयार केली आहे, त्यामुळे उलट उत्पादनातही वाढ झाली आहे. यात त्यातील क्लोरोफिल हे द्रव्यही शाबूत ठेवल्याने त्यातील चयापचयाची क्रिया ही कमी ऑक्सिजनवर चालू शकतेच.
ज्या वनस्पतींना पुराच्या पाण्यामुळे बराच काळ ऑक्सिजनच मिळत नाही त्या टिकू शकत नाहीत व ऑक्सिजनच्या अभावे मरतात. नेहमीचे पूर व पाणथळ यामुळे पिकांचे उत्पादन कमी होते. त्यामुळे पुरातही टिकू शकतील अशा वनस्पतींच्या प्रजाती तयार करणे जागतिक अन्न सुरक्षेच्या निमित्ताने आवश्यक आहे.
 इतर अन्नधान्यापेक्षा बार्ली हे पीक पुरात जास्त धोक्यात येते व सरासरी उत्पादन ५० टक्क्यांनी कमी येते. त्यामुळे एकूणच अन्नधान्य उत्पादन कमी होते. इतर पिकांमध्येही हा परिणाम होतो, त्यामुळे जास्त पावसाच्या प्रदेशात टिकू शकतील, अशा अन्नधान्याच्या प्रजाती तयार करणे महत्त्वाचे आहे. इतर पिकांमध्येही आता जास्त पाण्यात टिकू शकतील अशा प्रजाती आम्ही शोधून काढणार आहोत, असे होल्सवर्थ यांनी सांगितले. हे संशोधन प्लान्ट बायोटेक्नॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
*  जास्त पावसाच्या प्रदेशात पाणी साठल्याने पिकांना कमी ऑक्सिजन मिळतो.
* चयापचयाची क्रिया बिघडल्याने उत्पादन ५० टक्के घटते.
* बार्ली म्हणजे जवाची जास्त पाण्यात टिकू शकणारी प्रजाती विकसित करण्यात यश.
* इतर अन्नधान्यांच्याही प्रजाती विकसित  करणार.
* जागतिक अन्नसुरक्षेत प्रतिकूल परिस्थितीत टिकणाऱ्या प्रजातींना महत्त्व.