Starbucks Strike on Red Cup Day: न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोहरान ममदानी हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. एकीकडे त्यांनी उघडपणे डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत घेतलेली ठाम विरोधाची व प्रसंगी टीकात्मक भूमिका चर्चेचा विषय ठरली. आता न्यूयॉर्कचे महापौर झाल्यानंतर ममदानी यांनी पहिला दणका लोकप्रिय उच्चभ्रू ब्रँड ‘स्टारबक्स’ला दिला आहे. न्यूयॉर्कमधील स्टारबक्सच्या धोरणावर टीका करत झोहरान ममदानी यांनी चक्क स्टारबक्सवर बहिष्कार घालण्याचं आवाहन न्यूयॉर्कमधील नागरिकांना केलं आहे.
झोहरान ममदानी यांनी आपल्या भूमिकेविषयी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये स्टारबक्सच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं केलेली पोस्ट त्यांनी पुन्हा शेअर करत त्यावर आपली भूमिका नमूद केली आहे. “आजपासून आम्ही स्टारबक्सचे सर्व कर्मचारी संपूर्ण अमेरिकेत संपावर जात आहोत. स्टारबक्सच्या इतिहासात हा सर्वात मोठा आणि सर्वाधिक काळ चालणारा संप करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत”, अशी पोस्ट स्टारबक्स कर्मचारी संघटनेनं केली आहे. शिवाय, जोपर्यंत संप चालू आहे, तोपर्यंत स्टारबक्समधून ग्राहकांनी काहीही खरेदी करू नये, असं आवाहनदेखील पोस्टमध्ये करण्यात आलं आहे.
स्टारबक्सबाबत झोहरान ममदानींची भूमिका काय?
दरम्यान, स्टारबक्स कर्मचाऱ्यांच्या या पोस्टवर झोहरान ममदानींनी भूमिका मांडली आहे. “देशभरात स्टारबक्सचे कर्मचारी कामाच्या अन्यायकारक कराराविरोधात संपावर गेले आहेत. आपल्या कामासंदर्भात न्याय्य स्वरूपाचा करार कंपनीने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत हे कर्मचारी संपावर आहेत, तोपर्यंत मी स्टारबक्समधून काहीही खरेदी करणार नाही. माझं सगळ्यांना आवाहन आहे, की तुम्हीही यात सहभागी व्हा. आपण एकत्र आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाला स्पष्ट संदेश देऊ शकतो. काँट्रॅक्ट नाही, तर कॉफी नाही”, अशी पोस्ट झोहरान ममदानी यांनी केली आहे.
स्टारबक्सचे कर्मचारी संपावर का गेलेत?
कामासाठीच्या कंत्राटातील नोंदींवर चर्चा करण्यास कंपनी व्यवस्थापन तयार नसल्याचा आरोप अमेरिकेतील ९ हजार स्टारबक्स कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेनं केला आहे. जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत संप चालू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. स्टारबक्सनं मात्र कर्मचारी संघटनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. कर्मचाऱ्यांना बाजारातील मानकांनुसार वेतन व इतर लाभ दिले जात असून कर्मचाऱ्यांची मागणी अवाजवी आहे, असा दावा कंपनी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Starbucks विरोधात १००० हून अधिक तक्रारी!
स्टारबक्सच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात नॅशनल लेबर रिलेशन्स बोर्डाकडे तब्बल एक हजाराहून अधिक तक्रारी दाखल केल्याची माहिती दिली आहे. हा संप नेमका कधी संपणार? याबाबत कर्मचारी संघटनेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. २०२३ पासून स्टारबक्सच्या कर्मचाऱ्यांनी केलेला हा चौथा संप आहे. स्टारबक्सचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO ब्रायन निकोल यांनी २०२४ साली पदभार स्वीकारला. तेव्हापासून कर्मचारी तिसऱ्यांदा संपावर गेले आहेत. अशाच प्रकारच्या गेल्या वर्षी झालेल्या संपामुळे अमेरिकेतील स्टारबक्सचे जवळपास ६० स्टोअर तात्पुरते बंद करावे लागले होते.
Red Cup Day चं काय होणार?
स्टारबक्स कंपनीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही Red Cup Day या आपल्या वार्षिक कार्यक्रमासाठी जोरदार नियोजन केलं होतं. २०१८ पासून याची सुरुवात झाली. या दिवशी स्टारबक्स आपल्या सर्व ग्राहकांना कोणत्याही पेयाच्या खरेदीवर पुनर्वापर करता येण्यासारखा कप मोफत देतं. पण ऐनवेळी कर्मचाऱ्यांनी Red Cup Rebellion या नावाखाली देशव्यापी संप पुकारल्यामुळे स्टारबक्स व्यवस्थापनासमोर पेच निर्माण झाला आहे.
