New Year 2024 Celebration : भारतात नवीन वर्षाची सुरुवात होण्यास अद्याप काही तास बाकी आहेत. परंतु, जगभरातल्या काही देशांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. सर्वात आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातल्या नागरिकांनी नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत केलं आहे. न्यूझीलंडमधील पूर्वेकडील प्रसिद्ध शहर ऑकलंडमधील लोक सध्या नववर्षाचा जल्लोष करत आहेत, एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. आधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात काही वेळापूर्वी आतषबाजी करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.
ऑस्ट्रेलियामधील सिडनी हार्बर पूलावर मोठी आतषबाजी करण्यात आली. येथे मोठ्या लाईट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. सिडनी हार्बर पूलावर आयोजित केला जाणारा लाईट शो जगभरातील ४० कोटी लोक टीव्ही आणि समाजमाध्यमांद्वारे पाहतात.
सिडनीच्या सुरक्षाविषयक विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, सुरक्षिततेसाठी संपूर्ण सिडनीत कालपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आजच्या दिवशी १० लाखांहून अधिक लोक सिडनी हार्बर पूल परिसरात जमतात. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोक इथे जमतात. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं ही मोठी जबाबदारी असते. ती आमच्या पोलिसांनी काटेकोरपणे निभावली आहे.
सर्वात आधी नववर्ष कुठे साजरं झालं
ओशनिया खंड ज्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी यासारखे बेटांचे देश आहेत येथे नवीन वर्षाचे प्रथम स्वागत केले जाते. किरिबाटी मधील किरितीमाती बेट हे नवीन वर्ष साजरे करणारे पहिले ठिकाण आहे. येथे १ जानेवारी सुरु झालं तेव्हा भारतात ३१ डिसेंबरच्या दुपारी ३.३० वाजले होते. टोंगा, सामोआ आणि किरिबाटी यांनी प्रथम नवीन वर्षाचे स्वागत केले, त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.
दरम्यान, काही तासांनी भारतातही नववर्षाचं स्वागत केलं जाईल. दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस, मुंबईत मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटीसह गोव्यातल्या अनेक बीचवर लोक नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमू लागले आहेत.