|| तुषार वैती

न्यूझीलंड हा जगाच्या नकाशावरील छोटासा ठिपका असलेला देश. मुंबईच्या तुलनेत बराच छोटा. जवळपास ४८ लाख लोकसंख्या असलेला. न्यूझीलंडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. अगदी दादरच्या शिवाजी पार्कपासून ते चर्चगेटच्या ओव्हल मैदानावर सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षाही कमी. असे असतानाही न्यूझीलंडने गेल्या ११ विश्वचषकांपैकी सात वेळा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. गेल्या तिन्ही विश्वचषकांमध्ये न्यूझीलंडने उपांत्य फेरीपर्यंत झेप घेतली होती. (त्या तुलनेत मुंबईच्या खेळाडूंची मात्र भारतीय संघातील संख्या खालावत चालली आहे.) यंदाही न्यूझीलंडने आपला उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.

खेळ हा न्यूझीलंडवासीयांच्या रक्तात भिनला आहे. रग्बी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय खेळ. तिथल्या लोकांचा जणू प्राणवायूच. क्रिकेट हा खेळ इतक्या वर्षांनंतरही आपल्या अस्तित्वासाठी झटत आहे; पण क्रिकेटला जिवंत ठेवण्यामागे रग्बीचा मोठा वाटा आहे. ८० ते ९०च्या दशकात न्यूझीलंडची एक दुबळा संघ म्हणून गणना होत होती; पण १९९२च्या विश्वचषकात मार्टिन क्रो यांच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आणि संपूर्ण क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर न्यूझीलंडने चार वेळा बाद फेरीत प्रवेश केला असला तरी त्यांना एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आले नाही. असे असले तरी त्यांची वाटचाल योग्य पद्धतीने सुरू आहे.

न्यूझीलंडची क्रिकेटची शैली म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजी, कमीत कमी धोका पत्करण्याची वृत्ती आणि नेहमीच प्रयोग करण्यासाठी तत्पर; पण २०१५च्या विश्वचषकात कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने न्यूझीलंडच्या या परंपरागत शैलीला छेद दिला. सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबण्याची ही नवी शैली न्यूझीलंडसाठी लाभदायी ठरली. मायदेशातच आयोजित केलेल्या या विश्वचषकात दोन्ही सहआयोजक देश अंतिम फेरीत पोहोचले; पण अंतिम फेरीत ब्रेंडन मॅक्क्युलम अपयशी ठरला आणि न्यूझीलंडच्या विश्वविजेतेपदाच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा पाणी फेरले.

मॅक्क्युलमच्या निवृत्तीनंतर केन विल्यम्सनने न्यूझीलंडची विजयी पताका कायम ठेवली आहे. विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने यंदाही पाच सामने जिंकून उपांत्य फेरीची दावेदारी पेश केली आहे. सुरुवातीला श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दुबळ्या संघांवर विजय मिळवल्यामुळे आणि भारतात रात्री प्रसारित झालेल्या सामन्यांमुळे तसेच भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे न्यूझीलंडची वाटचाल अधोरेखित झाली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाने त्यांचा विजयरथ रोखला गेला.

‘पॉवर-प्ले’ आणि अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये ताकदवान फटक्यांचा नजराणा पेश करणारे मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, हेन्री निकोल्स यांच्यासारखे, तर मधल्या षटकांमध्ये डावाला स्थैर्य देणारे विल्यम्सन आणि अनुभवी रॉस टेलरसारखे फलंदाज किवींकडे आहेत. या प्रत्येकाने आपल्यावरील जबाबदारीला आतापर्यंत योग्य न्याय दिला आहे. त्याचबरोबर ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, लॉकी फग्र्युसन या वेगवान गोलंदाजांनी आणि फिरकीपटू मिचेल सँटनेरने न्यूझीलंडच्या यशात योगदान दिले आहे. गेल्या विश्वचषकानंतर विल्यम्सनच्या बॅटची धार अधिक वाढली असून जणू तो न्यूझीलंड संघाचा मुख्य कणा बनला आहे. कारकीर्दीत अनेक चढउतार अनुभवणारा आणि गेली १३ वर्षे न्यूझीलंड क्रिकेटची सेवा करणारा रॉस टेलर कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असला तरी त्याचे नाणे खणखणीत वाजत आहे. त्यामुळे या दोघांवरच न्यूझीलंडचे पुढील यशापयश अवलंबून असणार आहे.

२०१५च्या विश्वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंडची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी ७६ सामन्यांत ४३ विजय इतकी होती. फक्त भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला त्या तोडीची कामगिरी करता आलेली आहे. २००६ मध्ये नेतृत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर विल्यम्सनने न्यूझीलंडला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. सकारात्मक आणि आक्रमक नेतृत्वशैली असलेल्या विल्यम्सनच्या कर्णधारपदाखाली खेळाडूही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र उपांत्य फेरीच्या उंबरठय़ावर असलेल्या न्यूझीलंडसाठी विश्वचषकाचे स्वप्न साकार करण्यासाठी फक्त दोन पावले पुढे टाकावी लागणार आहेत; पण भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघांचा अडसर समोर असताना किवींसाठी हे दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, अशीच धाकधूक त्यांच्या क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.