देशाचा राष्ट्रीय ध्वज बदलण्याबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन के यांनी मंगळवारी देशात जनमत चाचणी घेण्याची घोषणा केली. पुढील तीन वर्षांत देशभरात व्यापक प्रमाणात मतदान प्रक्रिया राबवून लोकांच्या भावना जाणून घेण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे.
न्यूझीलंडच्या सध्याच्या झेंडय़ात डावीकडे वर ब्रिटनच्या युनियन जॅकचा, तसेच लाल रंगाच्या ताऱ्यांचा समावेश आहे. मात्र सध्याचा झेंडा हा ऑस्टेलियासारखा दिसत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. तसेच ब्रिटनच्या झेंडय़ाचा समावेश असल्यामुळे न्यूझीलंड अद्याप स्वतंत्र झाला नसल्याचे दिसून येते, असे मतही नागरिकांनी मांडले. काहींनी राष्ट्रीय झेंडय़ात बदल करावे, तर काहींनी त्यात बदल न करण्याबाबतची भूमिका मांडली आहे.
दरम्यान, पंतप्रधान के यांनी राष्ट्रीय झेंडय़ावर चंदेरी रंगाचा वृक्ष दाखवावा आणि त्याची पाश्र्वभूमी काळी ठेवावी, असे म्हटले आहे. मात्र विरोधकांनी त्याला आक्षेप घेतला असून अशा प्रकारचा झेंडा क्रीडा पथकांकडून वापरला जात असून तसेच स्मरण वारंवार होत राहील, असे म्हटले आहे.