Honeymoon Couple Missing नुकतंच लग्न झालेलं जोडपं मधुचंद्राला गेलं आणि बेपत्ता झालं अशी घटना समोर आली आहे. मेघालयातल्या शिलाँगला हे दोघंही मधुचंद्रासाठी गेले आणि त्यानंतर त्यांचा फोन लागेनासा झाला, संपर्क झाला नाही. दोघांच्याही कुटुंबीयांची चिंता वाढली. ज्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि पोलिसांनी या जोडप्याचा शोध सुरु केला आहे.
नेमकी काय घटना घडली?
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशीचं लग्न सोनमशी झालं. ११ मे रोजी हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम दोघंही मधुचंद्रासाठी रवाना झाले. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हे दोघंही सुरुवातीला बंगळुरुला गेले. त्यानंतर बंगळुरुमार्गे हे दोघंही गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले आणि त्यांनी तिथे जाऊन दर्शन घेतलं. २३ मे रोजी ते शिलाँगला रवाना झाले. या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे शिलाँग या ठिकाणी दाखवतं आहे. या दोघांनीही भाडे तत्त्वावर फिरण्यासाठी मिळणारी अॅक्टिव्हा घेतली होती अशीही माहिती मिळाली आहे. या ठिकाणी असलेल्या पर्वतरांगा पाहण्यासाठी हे दोघं गेले होते.
२४ मे रोजी काय घडलं?
राजा आणि सोनम या दोघांशीही संपर्क होऊ न शकल्याने आणि त्यांचे मोबाइल स्विच ऑफ लागल्याने दोघांच्याही कुटुंबीयांची चिंता वाढली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की या दोघांचा मोबाइल नेटवर्कमुळे बंद झाला असेल. पण कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही तेव्हा या सगळ्यांची काळजी वाढली. ज्यानंतर सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन हे तातडीने शिलाँगला गेले. तिथे ते या दोघांचा शोध घेऊ लागले. गुगल मॅपवरुन या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन कुठे होतं? याची माहिती गोविंदने काढली. तसंच ज्या माणसाने राजा आणि सोनमला अॅक्टिव्हा भाड्याने दिली होती त्याच्याशीही विपिन आणि गोविंदने संपर्क साधला. पोलिसांना संपर्कही साधण्यात आला.
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना एक अॅक्टिव्हा सापडली. ज्या भागात हे दोघं हरवले आहेत त्या भागात एक रिसोर्टही आहे. जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. आम्ही सगळे पैलू तपासून या दोघांचा शोध घेत आहोत असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांशी संवाद साधताना भाषेची अडचण
राजाचा भाऊ सचिन याने सांगितलं की आम्हाला स्थानिक पोलिसांशी संवाद साधताना भाषेची अडचण येते आहे. आम्ही हे जेव्हा इंदूर पोलिसांना सांगितलं तेव्हा इंदूरचे पोलीस आयुक्त संतोष सिंग यांनी संपर्क केला. मधुचंद्राला गेलेलं जोडपं बेपत्ता झालं आहे हे त्यांनी तिथल्या पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा तपास आता मध्य प्रदेश पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मधुचंद्राला गेले्या या दोघांचाही शोध ते घेत आहेत तसंच सातत्याने शिलाँग पोलिसांच्या संपर्कात आहेत.