सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमातला चाँद नवाब आठवतोय? ती भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने वठवली होती. सलमानच्या भूमिकेइतकेच नवाजउद्दीनच्या भूमिकेचेही कौतुक झाले होते. नवाजुद्दीनने साकारलेली ती भूमिका पाकिस्तानच्या चाँद नवाब नावाच्या खऱ्याखुऱ्या पत्रकारावर बेतली होती. ज्याचा पीटीसी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पाकिस्तानच्याच आणखी एका पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्या पत्रकाराने स्वतःच्याच लग्नाची बातमी दाखवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. एखाद्या लग्नाला गेल्यावर पत्रकार ज्या प्रमाणे मुलाखती घेतात अगदी त्याचप्रमाणे या पत्रकाराने स्वतःच्याच लग्नात रिपोर्टिंग केले.
hilarious!! City41 reporter covering his own wedding ceremony. #PakistaniMedia pic.twitter.com/FC8PYNRD0v
— Amar Guriro (@amarguriro) February 4, 2018
स्वतःच्या लग्नाची बातमी दाखवणारा आणि लग्नाला आलेल्या नातेवाईकांच्या मुलाखती घेणारा हा पाकिस्तानी पत्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलमध्ये काम करणाऱ्या या पत्रकाराने स्वतःच्याच लग्नात रिपोर्टिंग केले. आपली ओळख करून देत तो नातेवाईकांची ओळख करून देतो त्यानंतर त्यांची मुलाखतही घेतो. लग्नाबाबत त्यांची प्रतिक्रियाही जाणून घेतो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. जो पाहिल्यावर आपण हसतोच. ट्विटरवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सिटी 41 या चॅनेलचा हा पत्रकार आहे.
या पत्रकाराने त्याच्या होणाऱ्या बायकोलाही प्रश्न विचारले आहेत. लग्नाच्या पेहेरावात हातात माईक घेऊन हा पत्रकार संपूर्ण लग्नात फिरला. तिथली व्यवस्था त्याने दाखवली. दोन्ही कुटुंबाशी त्याने चर्चा केली आणि मग त्याने आपला मोर्चा होणाऱ्या पत्नीकडे वळवला. पत्नीलाही त्याने प्रश्न विचारले हा सगळा प्रकार सोशल मीडियावर बहुदा पहिल्यांदाच घडला असावा पण हा व्हिडिओ पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू आवरत नाही. त्यामुळे पाकिस्तानला आणखी एक चाँद नवाब मिळाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.