वैष्णोदेवी मंदिरानंतर आता राष्ट्रीय हरित लवादाने सोयी सुविधांच्या मुद्द्यावरुन अमरनाथ मंदिर व्यवस्थापन समितीला फैलावर घेतले आहे. भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांवरुन लवादाने अमरनाथ मंदिर व्यवस्थापनाची कानउघाडणी केली आहे. याबद्दलचा अहवाल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात यावा, असा आदेश लवादाने दिला आहे.

‘गर्दीच्यावेळी दुर्घटना घडू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. या सूचनांच्या अंमलबजावणीचे काय झाले,’ असा प्रश्न हरित लवादाने अमरनाथ मंदिर व्यवस्थापन समितीला विचारला आहे. अमरनाथला येणाऱ्या भाविकांना नव्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबद्दलच्या सूचना करण्यासाठी हरित लवादाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. पर्यावरण आणि वन विभागाचे अतिरिक्त सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

याआधी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने वैष्णोदेवी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा आदेश दिला. यामुळे एका दिवसात वैष्णोदेवी मंदिराला केवळ ५० हजार भाविकांनाच भेट देता येणार आहे. गर्दी वाढल्याने अनुचित घटना घडू नये, यासाठी हे आदेश देण्यात आले. न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या खंडपीठाने सोमवारी हे आदेश दिले. याशिवाय वैष्णोदेवी मंदिर परिसर स्वच्छ राखण्याचे आदेशदेखील लवादाकडून देण्यात आले.

वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच हरित लवादाने भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले. ‘वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी ५० हजारांपेक्षा अधिक भाविक आल्यास, त्यांना अर्द्धकुंवारी किंवा कटरा येथेच थांबवण्यात यावे. वैष्णोदेवीच्या दरबाराची क्षमता ५० हजार इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त भाविकांना दरबारात जाण्याची परवानगी दिल्यास ते धोकादायक ठरु शकते. म्हणूनच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत,’ असे हरित लवादाने म्हटले. मात्र हे आदेश केव्हापर्यंत लागू असणार आहेत, याबद्दल हरित लवादाने कोणतीही माहिती दिलेली नव्हती.