हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाऊद्दीनच्या मुलाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरूवारी सकाळी रामबाग परिसरातून अटक केली आहे. सय्यद शकील अहमदला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांना आर्थिक मदत (टेरर फंडिंग) केल्याप्रकरणी शकील अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांकडून अद्याप याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

एनआयए, स्थानिक सुरक्षा दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शकीलला अटक केली. शकील व्यवसायाने लॅब टेक्निशियन आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सलाऊद्दीनच्या आणखी एका मुलाला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात सय्यद शाहीद युसूफला मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

२०११ मध्ये टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएने युसूफला अटक केली होती. पाक व्याप्त काश्मीरमध्ये राहत असलेले आपले वडील सय्यद सलाऊद्दीनकडून युसूफने दहशतवादी कारवायांसाठी कथितरित्या पैसे घेतल्याचा आरोप आहे.