‘आयसिस’शी संबंध असल्याच्या संशयातून दोघांची चौकशी
कासरगोड ‘मॉडय़ुल’प्रकरण आणि श्रीलंकेतील बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी इस्लामिक स्टेट (आयसिस)या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन संशयितांच्या केरळमधील घरांवर छापे घातले.
कासरगोड येथील दोन संशयितांच्या, तर पलक्कड येथील एकाच्या घरावर छापे घालण्यात आल्याची माहिती ‘एनआयए’च्या सूत्रांनी दिली. तिघेही संशयित कासरगोड प्रकरणातील आरोपीशी संबंधित असल्याचा ‘एनआयए’चा कयास आहे. त्यांची कसून चौकशीही करण्यात आल्याचे वृत्त आहे.
छाप्यांमध्ये मोबाइल फोन, सिम कार्ड्स, मेमरी कार्ड्स, पेन ड्राइव्ह्ज इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर मल्याळी आणि अरबी भाषेतील मजकुराच्या दैनंदिन नोंदवह्य़ा, वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईकच्या भाषणाच्या डीव्हीडी आणि पुस्तके आणि सईद कुतेबची पुस्तकेही जप्त करण्यात आल्याचे ‘एनआयए’ने सांगितले. डिजिटल साधनांचे परीक्षण आणि विश्लेषण न्यायवैद्यक प्रयोगशाळेत करण्यात येईल, असेही ‘एनआयए’ने स्पष्ट केले.
गेल्या वर्षी ‘एनआयए’ने हबीब रहमान नावाच्या एका २५ वर्षांच्या तरुणाला अटक केल्यानंतर प्रथम आयसिस मॉडय़ुल प्रकरण प्रकाशात आले होते. भारत आणि मध्य-पूर्व आशियातील १४ जण आपल्या नोकऱ्या सोडून आयसिसमध्ये सामील झाल्याचे हबीबच्या चौकशीतून निष्पन्न झाले होते.
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांशी संबंध?
‘एनआयए’ने घरांवर छापे घातलेले संशयित अबु बाकर सिद्दिकी आणि अहमद अराफत समाजमाध्यमांद्वारे श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या जिहादींच्या संपर्कात असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. ‘एनआयए’ने त्यांना ताब्यात घेणे टाळले असले तरी २९ एप्रिलला कोची येथील आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.