राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (रविवार) तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ४० ठिकाणी छापे टाकून चार जणांना ताब्यात घेतले. ही छापेमारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात कथितरित्या दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आणि धर्माच्या आधारावर गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्यासाठी प्रशिक्षण शिबिर चालवल्याप्रकरणी करण्यात आली आहे.

दहशतवादविरोधी तपास यंत्रणेने तेलंगणात ३८ आणि आंध्र प्रदेशात दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले की कारवाईदरम्यान डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, दोन खंजीर आणि ८.३१ लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तेलंगणातील निजामाबाद पोलीस ठाण्यात सुरुवातीला ४ जुलै रोजी पीएफआयच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि चार आरोपी अब्दुल कादर, शेख सहदुल्ला, मोहम्मद इम्रान आणि मोहम्मद अब्दुल मोबीन यांना राज्य पोलिसांनी अटक केली.

प्रवक्त्याने सांगितले की NIA ने नंतर २६ ऑगस्ट रोजी तपास पुढे नेण्यासाठी पुन्हा गुन्हा नोंदवला. तेलंगणातील निजामाबादमध्ये २३, जगत्यालमध्ये ७, हैदराबादमध्ये ४, निर्मलमध्ये २ आणि आदिलाबाद आणि करीमनगर जिल्ह्यात प्रत्येकी एका ठिकाणी शोध घेण्यात आला. तपास संस्थेने आंध्र प्रदेशात खादर आणि २६ अन्य लोकांशी संबंधित प्रकरणात कर्नूल आणि नेल्लोर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका ठिकाणी तपासणी केली आहे.

हे आरोपी कथितरित्या दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्यासाठी शिबिरांचे आयोजन करत होते. भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला बाधा आणणाऱ्या कारवायांमध्ये गुंतल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, एफआयआर मध्ये म्हटले आहे की “पीएफआयच्या सदस्यांनी कराटे वर्गाच्या नावाखाली तरुणांसाठी प्रशिक्षण आणि शारीरिक व्यायाम सुरू केले आणि त्यांना आपली द्वेषपूर्ण भाषणं आदींद्वारे एका विशिष्ट समुदायाविरोधात भडकावले.” याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.