१९९३मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या चित्रपट अभिनेता संजय दत्त याला ‘क्षमा’ करून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी निर्माता- दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी येथे केली.
५३ वर्षीय अभिनेता संजय दत्त याला २००६मध्ये टाडा न्यायालयाने बेकायदेशीररीत्या अत्याधुनिक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्यासंदर्भात जामिनावर सुटका होण्याअगोदर संजय दत्तने १८ महिने तुरुंगवास भोगला होता. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच निर्णय देताना त्याच्या तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीच्या आधारे ही शिक्षा पाच वर्षांची केली आहे. त्यामुळे अजूनही संजय दत्त याला सुमारे साडेतीन वर्षे तुरुंगवास भोगावयाचा आहे.
निहलानी यांनी यासंदर्भात सांगितले की, संजय दत्त याला आपल्या चुकीच्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला असून गेल्या २० वर्षांत त्याच्या कुटुंबीयांनीही याप्रकरणी बरेच काही सोसले आहे. याअगोदरची त्याची तुरुंगातील चांगली वागणूक पाहून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्याला क्षमा करणे योग्य ठरेल.