Nikki Haley : चीनला सूट देऊन अमेरिकेने भारतासारख्या बळकट सहकारी देशाशी असलेले व्यावसायिक हितसंबंध बिघडवू नये असं वक्तव्य रिपब्लिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या नेत्या निकी हॅले यांनी केलं आहे. रशियाकडून तेल घेऊन आणि त्याची विक्री करून भारत मोठा नफा कमवत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यानंतर आता निकी हॅले यांचं विधान समोर आलं आहे.

काय म्हटलं आहे निकी हॅले यांनी?

निकी हॅले यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की भारताने रशियाकडून कच्च तेल खरेदी करायला नको. पण चीन हा एक विरोधी देश आहे. तसंच रशिया आणि इराण यांच्याकडून कच्चं तेल खरेदी करण्यात चीनचा सिंहाचा वाटा आहे. अशा देशाला टॅरिफपासून ९० दिवसांची सूट दिली गेली आहे. चीनला सूट देणं योग्य नाही शिवाय भारतासारख्या मजबूत राष्ट्राशी अमेरिकेने हितसंबंध बिघडवणं योग्य नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा काय?

रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे येत्या २४ तासांत भारतावर लक्षणीय प्रमाणात आयात शुल्क लादले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिला. त्याचवेळी पुन्हा एकदा भारत आकारत असलेले आयात शुल्क जगात सर्वाधिक असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ‘सीएनबीसी स्वॉक बॉक्स’ या कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ट्रम्प म्हणाले, की सर्वाधिक आयात शुल्क ही भारताबाबत लोकांना न आवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर खूप कमी व्यापार करतो. मुलाखतीदरम्यान संभाव्य व्यापार कराराबाबत विचारले असता त्यात काही अचडणीचे मुद्दे असल्याचे ट्रम्प म्हणाले. ‘‘सर्वाधिक आयात शुल्कापासून ते शून्य आयात शुल्क लावण्यास तयार झाले आहेत. पण तेलाबाबत ते जे करतायत (रशियाकडून खरेदी) त्यामुळे हेदेखील पुरेसे नाही,’’ असं ट्रम्प म्हणाले होते त्यानंतर निक्की हॅले यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

दक्षिण कॅरोलाइनच्या माजी गव्हर्नर निक्की हॅले याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत होत्या. अमेरिका प्रशासनात भारतीय कॅबिनेट स्तरावर नियुक्ती झालेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या नेत्या ठरल्या. निक्की हॅले यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली पण नंतर त्यांनी या रेसमधून माघार घेतली.