Nikki Haley warns Donalld Trump Losing India : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावाचे राहिले आहेत. यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी अमेरिका-भारत संबंध बिघडण्याच्या स्थितीत असल्याबद्दल इशारा दिला आहे. तसेच वॉशिंग्टनला जर चीनच्या जागतिक महत्वकांक्षा रोखायच्या असतील तर हे संबंध तात्काळ सुधारले गेले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

न्यूजवीकमध्ये बुधवारी प्रसिद्ध झालल्या एका लेखात हेली म्हणाल्या की, ट्रम्प प्रशासनाला रशियन तेलावरील शुल्क आणि वादांमुळे जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहींमध्ये दरी निर्माण होऊ देणे परवडणारे नाही. “सर्वात महत्त्वाचे काय आहे हे अमेरिकेने विसरू नये : आपली एक असलेली उद्दिष्टे,” असे त्यांनी लेखात लिहिले आहे. “चीनचा सामना करण्यासाठी, अमेरिकेसाठी भारत एक मित्र असणे आवश्यक आहे,” असेही हेली म्हणाल्या आहेत.

रशियन तेलाच्या मुद्द्यावर भारत-अमिरेका संघर्ष

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के व्यापार शुल्क लादले आणि रशियन तेल खरेदी केल्यामुळे नंतर आणखी अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम करण्यात आपली भूमिका असल्याचे घोषणा केल्यानंतर भारत-अमेरिका संबध तणावपूर्ण बनले होते.

ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनमधील युद्धाला भारत निधी पुरवत असल्याचा दावा करत भारतावर शुल्क लादले आहे.

“आशियातील चिनी वर्चस्वाला तोंड देऊ शकणाऱ्या एकमेव देशाबरोबर २५ वर्षांत केलेली वाटचाल रोखणे ही एक धोरणात्मक चूक ठरेल,” असे हेली म्हणाल्या आहेत. तसेच त्यांनी दावा केला की, भारत हा वॉशिंग्टनच्या आर्थिक आणि संरक्षणात्मक उद्दिष्टांसाठी आवश्यक आहे. चीनपासून पुरवठा साखळी दूर नेण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न केला जात असताना, भारत वस्त्रोद्योग, मोबाईल फोन व सौर पॅनेल यांसारख्या उद्योगांमध्ये चीन सारख्या पातळीवरील उत्पादन क्षमता देऊ करतो.

हेली यांनी भरातची अमेरिका आणि मित्र राष्ट्र इस्रायल यांच्याशी वाढत अशलेले संरक्षण संबंधांकडे लक्ष वेधले, आणि यामुळेच भारत हा ‘फ्री वर्ल्ड्स सेक्युरिटी’साठी एक महत्त्वाचा घटक असल्याचे म्हटले. दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर हेली यांनी ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात दोन्ही देशांचे संबंध बिघडण्याच्या पार्श्वभूमिवर थेट संवाद झाला पाहिजे असेही स्पष्ट केली.