एएनआय, नवी दिल्ली

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान बजावलेल्या अभूतपूर्व कामगिरीमुळे हवाई दलाच्या नऊ जवानांना ‘वीरचक्र’ देण्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली. या कारवाईत हवाई दलाने पाकिस्तानची सहा लढाऊ विमाने निकामी केली होती. युद्धात लष्करी शौर्य गाजविलेल्या जवानांना ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात येते. ‘परमवीरचक्र’ आणि ‘महावीरचक्र’ यांच्यानंतर या पदकाचा क्रमांक लागतो. याखेरीज सीमा सुरक्षा दलाच्या १६ जवानांना शौर्यपदके जाहीर करण्यात आली.

पाकिस्तानमधील मुरिदके आणि बहावलपूर भागात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या, पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य करणाऱ्या हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांचाही यात समावेश आहे. ग्रुप कॅप्टन रणजीतसिंग सिद्धू, मनीष अरोरा, अनिमेष पटनी, कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार, सिद्धांत सिंग, रिझवान मलिक, फ्लाइट लेफ्टनंट अर्शवीर सिंह ठाकूर यांना ‘वीरचक्र’ जाहीर झाले आहे.

बीएसएफ’च्या १६ जवानांना शौर्य पदके

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) १६ जवानांना शौर्य पदके जाहीर झाली असून, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान बजावलेल्या अभूतपूर्व कामगिरीमुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ‘बीएसएफ’ने म्हटले आहे, ‘‘या स्वातंत्र्यदिनी सीमेवरील १६ सुरक्षार क्षकांचा शौर्यपदकांनी सन्मान करण्यात येत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान त्यांनी गाजविलेल्या शौर्याचा हा सन्मान आहे. ही पदके म्हणजे देशाने ‘बीएसएफ’वर दाखविलेल्या विश्वासाचा सन्मान आहे.’’ ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान ‘बीएसएफ’चे दोन जवान शहीद झाले होते.

पोलीस, अग्निशामक दलातील जवानांचा सन्मान

केंद्रीय गृह मंत्रालयाने १०९० जवानांना शौर्य, सेवा पदके जाहीर केली आहेत. पोलीस, अग्निशामक दल, होम गार्ड आणि नागरी संरक्षण यांचा शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मान करण्यात आला आहे.

या पदकांमध्ये २३३ शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेसाठी ९९ राष्ट्रपती पदके (पीएसएम), ७५८ गुणवान सेवेसाठीच्या पदकांचा (एमएसएम) समावेश आहे. २३३ शौर्य पदकांमध्ये जम्मू-काश्मीर भागातील कामगिरीसाठी सन्मान झालेल्या १५२ जवानांचा समावेश आहे. ५४ जवानांनी नक्षलवादी भागात, ३ जवानांनी ईशान्य भारतात आणि २४ देशाच्या इतर भागांतील आहेत. या शौर्य पदकांमध्ये २२६ पोलीस, सहा अग्निशामक दलातील जवान आणि होम गार्ड आणि नागरी संरक्षण विभागातील एका जवानाचा समावेश आहे.

९९ ‘पीएसएम’पैकी ८९ पोलीस सेवेसाठी, ५ अग्निशामक दलातील जवानांना, होम गार्ड आणि नागरी संरक्षण विभागातील तिघांना, तर ‘करेक्शनल सर्व्हिसेस’साठी दोघांना सन्मानित करण्यात आले आहे. ७५८ ‘एमएसएम’ पदकांपैकी ६३५ पदके पोलीस सेवेसाठी, ५१ अग्निशामक दलांतील जवान, नागरी संरक्षण व होम गार्ड विभागातील ४१ आणि करेक्शनल सेवेसाठी ३१ जणांना सन्मानित करण्यात आले आहे.