मालेगाव बॉम्बस्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींची सोमवारी विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. यापैकी शब्बीर अहमद याचा गेल्यावर्षी अपघातात मृत्यू झाला असल्याने उर्वरित आठ आरोपींना या प्रकरणात तूर्त दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला.
मालेगाव बॉम्बस्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींबद्दल आपल्याकडे सबळ पुरावे नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोन वर्षांपूर्वी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाला सांगितले होते. मात्र काही दिवसांपूर्वी एनआयएने आपल्या आधीच्या भूमिकेवरून घुमजाव करत या नऊ मुस्लिमांच्या सुटकेला विरोध दर्शवला होता. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले होते. अखेर सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या नऊ मुस्लिमा आरोपींमध्ये नूरूल हुडा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फार्सी, फरोघ मगदुमी, शेख मोहम्मद अली, असीफ खान, मोहम्मद झाहीद आणि अब्रार अहमद यांचा समावेश आहे. या सर्वांना २००६ मध्ये बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
यापैकी दोघांना मुंबईतील २००६ मधील ७/११ बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्याने त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शब्बीर अहमद याचा गेल्यावर्षी अपघातात मृत्यू झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine muslim accused in malegaon bomb blast case acquitted
First published on: 25-04-2016 at 15:26 IST