दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या विनय शर्माने झोपेच्या कारागृहातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर मफलरने स्वत:ला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेनंतर विनय शर्मा याला दिल्लीच्या दिनदयाळ उपाध्याय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, अद्यापपर्यंत त्याच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दिल्लीत २०१२ मध्ये चालत्या बसमध्ये तरुणीवर सहाजणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. क्रूरतेची परिसीमा गाठणा-या या घटनेतनंतर पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता. देशभरातून या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त करण्यात आला होता. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. न्यायालयाने याप्रकरणी आरोपी विनय शर्माला फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपी विनय शर्माने गतवर्षी जेलमध्ये आपल्या सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होता. काही कैदी आणि पोलीस आपला शारिरीक छळ करत असल्याचा आरोप त्याने केला होता.
दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तीन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणातील आरोपी राम सिंग याचा खटला सुरू असतानाच २०१३ साली तिहार कारागृहात मृत्यू झाला होता. तर अन्य एका आरोपीची अल्पवयीन असल्यामुळे सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाकडून विनय शर्मा, अक्षय ठाकूर, मुकेश आणि पवन गुप्ता यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या निर्णयाविरोधात आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirbhaya case convict vinay sharma attempts suicide in tihar jail
First published on: 25-08-2016 at 08:49 IST